यमुना काठावर छठ पूजेची अनुमती देण्यास नकार
दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाने यमुना नदीत छठ पूजा करण्याची अनुमती देण्यास बुधवारी नकार दिला आहे. यमुना नदीच्या घाटावर छठ पूजा करण्यावरुन दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यमुना नदीच्या काठावर उत्सव साजरा करण्यावर राज्य सरकारने घातलेल्या बंदीच्या निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते.
यमुना नदीच्या काठावर पूजा करण्याऐवजी अन्य घाट आणि निर्धारितस्थळी पूजा केली जाऊ शकते. ही बंदी यमुना नदीतील प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे घालण्यात आली आहे. अशाप्रकारच्या विषारी पाण्यात स्नान केल्यास लोक आजारी पडू शकतात असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्लीत राज्य सरकारकडून 1 हजारांहून अधिक ठिकाणी प्रकाशयोजना, साफसफाई आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अनेक घाटांवर मैथिली-भोजपुरी अकॅडमीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.