सीमेवरील चिनी सैनिकांच्या संख्येत घट
भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक परिवर्तन शक्य : दोन्ही देशांमध्ये तणाव निवळत असल्याची स्पष्ट चिन्हे : चर्चाफेऱ्यांचे यश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये सकारात्मक परिवर्तन होत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीपासून चीनने भारताला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आपल्या सैनिकांच्या संख्येत घट केली आहे. ही माहिती भारताच्या संरक्षण विभागाच्या अधिकृत अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये काही सुधारणा झाल्याचे मत व्यक्त होत आहे.
चीनने सध्या भारतासमवेतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 10 आर्म्स ब्रिगेड आकाराच्या संयुक्त तुकड्या नियुक्त केल्या आहेत. सीमेवर पारंपरिक प्रशिक्षण केंद्रांमधील प्रशिक्षणार्थी सैनिकांची संख्याही कमी केली आहे. भारतानेही चीनच्या तोडीस तोड सैनिक संख्या सीमेवर ठेवली आहे. अचानक कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी तिच्याशी दोन हात करता येतील अशी पूर्ण सज्जता भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ठेवली आहे, असेही या महत्त्वाच्या अहवालात स्पष्ट केलेले आहे.
गलवान घटनेनंतर वाढला तणाव
2020 मध्ये लडाखमधील गलवान येथे भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष घडला होता. या संघर्षात दोन्ही देशांचे अनेक सैनिक प्राणास मुकले होते. भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील सैनिकी आणि राजकीय संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला, जो पुढे चार वर्षे टिकून होता. मधल्या काळात भारत आणि चीन यांच्या वरिष्ठ सैनिक अधिकाऱ्यांमध्ये सीमेवरील तणाव निवळावा म्हणून चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. 2024 नंतर या प्रयत्नांना अधिक वेग प्राप्त झाला. या चर्चेचा सुपरिणाम 2025 पासून प्रत्यक्ष दिसून येऊ लागलेला आहे.
चर्चेच्या 34 फेऱ्या
तणाव शिगेला पोहचल्यापासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैनिकी कमांड अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या 34 फेऱ्या पार पडल्या. त्यांच्यापैकी 33 वी आणि 34 वी फेरी अनुक्रमे मार्च 2025 आणि जुलै 2025 मध्ये पार पडली होती. तेव्हापासून तणाव निवळण्यास प्रारंभ झाला. तणाव काळात दोन्ही देशांनी त्यांच्या सेना एकमेकींपासून अगदी कमी अंतरावर आणल्या होत्या. मात्र, 2025 च्या मध्यापासून दोन्ही देशांनी आपल्या सेना तणावपूर्व स्थितीत आणण्यात प्रारंभ केला होता. ही प्रक्रिया 2026 च्या प्रारंभी पूर्ण करण्यात आली. आता चीनने सीमेवरील आपल्या सैनिकांची संख्या कमी केल्याने संबंध सुधारत असल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान मोदी यांचा चीन दौरा
ऑगस्ट 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य शिखर परिषदेच्या (एसीओ) निमित्ताने चीनचा दौरा केला. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा झाली. त्या दौऱ्यापासून सीमेवरील तणाव निवळण्यास खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. सीमेसंबंधी दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. तथापि, मतभेदांचे रुपांतर संघर्षात होऊ नये, या सूचनेला दोन्ही देशांनी मान्यता दिली.
‘ब्रिक्स’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी नुकतीच दिल्लीत प्रत्यक्ष चर्चा केली आहे. ‘ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांची साधारणत: 50 मिनिटे समोरासमोर चर्चा झाली. क्षी जिनपिंग यांचा हा सात वर्षांनंतरचा प्रथम भारत दौरा होता. त्यांचा भारत दौरा होणे आणि दोन्ही नेत्यांची थेट चर्चा होणे, या दोन्ही घटना, दोन्ही देशांमधील संबंध सुधारत असल्याचे दर्शवित आहेत, असे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे. तरीही सीमेवर भारताने सावधानता ठेवली असून सीमा संरक्षणासंदर्भात कडेकोट सज्जता ठेवली आहे. एका बाजूला सौहार्दासाठी प्रयत्न केले जात असतानाच, दुसरीकडे संरक्षण सिद्धताही ठेवण्यात आलेली आहे.
सौहार्द आणि सज्जता
ड दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याची शक्यता असली, तरी भारताची सज्जता
ड पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यातील प्रत्यक्ष चर्चेमुळे स्थिती स्थिर