सौरव गांगुलीच्या सुरक्षेत कपात
आता ‘झेड’ ऐवजी ‘वाय’ दर्जाची सुरक्षा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (सीएबी) अध्यक्ष सौरव गांगुलीची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. त्यांची सुरक्षा ‘झेड’ श्रेणीतून ‘वाय’ श्रेणीत आणण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून गांगुलीला ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात येत होती. मात्र, नुकत्याच झालेल्या सुरक्षा आढाव्यानंतर राज्य प्रशासनाने त्यांची सुरक्षा श्रेणी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सौरव गांगुलीची गणना भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून केली जाते. त्यांच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवीन ओळख निर्माण केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही ते क्रिकेटविश्वात सक्रिय राहिले आहेत. सध्या गांगुली हे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (सीएबी) अध्यक्ष असून क्रीडा जगतातील एक प्रमुख व्यक्तिमत्व मानले जातात.