महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या खर्चात काटकसर करा
बेळगाव : महापालिकेच्या महसुलात वाढ होण्यासाठी गुरुवारच्या अर्थसंकल्पीय पूर्वतयारी बैठकीत उपस्थितांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. मात्र, हे करत असताना महापालिकेकडूनही केल्या जाणाऱ्या खर्चात काटकसर करणे जरुरीचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. ज्या अधिकाऱ्यांना विनाकारण भाडेस्वरुपी गाड्या देण्यात आल्या आहेत, त्या देण्यात येऊ नयेत. त्यामुळे इंधनावर केला जाणारा खर्च कमी होईल, अशी महत्त्वपूर्ण सूचना यावेळी करण्यात आली. गणपत गल्ली, बापट गल्ली आदी ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी एका घरात दहा दुकाने थाटली आहेत. पण त्यांच्याकडून एकाच दुकानाचा कर महापालिकेला भरला जातो. महापालिकेची अनेक व्यापारी आस्थापने आहेत.
त्या ठिकाणी व्यावसायिक दुकाने सुरू करून त्यांचे लिलाव स्वरुपात वितरण करण्यात यावे. जेणेकरून महापालिकेला कर स्वरुपात उत्पन्न मिळेल. खंजर गल्लीत महापालिकेने लक्ष घालून विकासकामे राबवावीत. तसे केल्यास त्याठिकाणाहून महापालिकेला दर महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल. पण त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. परिणामी खंजर गल्लीत गांजा, जुगार, मटका आदी बेकायदेशीर प्रकार वाढले आहेत. महापौर, उपमहापौर, आयुक्तांव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांना भाड्याने घेतलेली वाहने देण्यात आली आहेत. सदर वाहनांना लागणाऱ्या इंधनासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. विनाकारण देण्यात आलेली वाहने बंद करून खर्चात काटकसर करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना उपस्थितांनी केली.