किरकोळ बाजारात लाल मिरचीला पसंती
दरही आवाक्यात, गृहिणींची लगबग, व्यावसायिकांकडून खरेदी : दरवाढीची शक्यता
बेळगाव : बाजारात लाल मिरचीची आवक हळूहळू वाढू लागली आहे. त्याबरोबर गृहिणींकडून खरेदी देखील होऊ लागली आहे. उन्हाळ्याला प्रारंभ झाल्यानंतर वर्षभराचे तिखट केले जाते. या पार्श्वभूमीवर लाल मिरचीला मागणीही वाढू लागली आहे. किरकोळ बाजारासह काकतीवेस आणि इतर ठिकाणीही लाल मिरचीची विक्री होऊ लागली आहे. मागील दोन वर्षात लाल मिरचीचे दर आवाक्याबाहेर गेले होते. प्रति किलो 400 ते 500 रुपयेपर्यंत लाल मिरचीचा दर झाला होता. त्या तुलनेत आता 180 ते 190 रुपये प्रति किलो लाल मिरची विक्री होऊ लागली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यात लाल मिरची आल्याने खरेदीलाही पसंती दिली जात आहे. यात्रा, जत्रांना प्रारंभ होऊ लागला आहे. त्यानंतर लग्नसराईला प्रारंभ होणार आहे. दरम्यान पुन्हा लाल मिरचीचा दर वाढण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून किरकोळ बाजारात लाल मिरची दाखल होऊ लागली आहे. बॅडगी 180 रुपये, गुंटूर 160 रु., संकेश्वरी 160 रु. याप्रमाणे लाल मिरचीचा दर आहे. यंदा मिरची उत्पादनात वाढ झाल्याने आवकही वाढू लागली आहे. मिरची खरेदीसाठी गृहीणींची लगबग पहावयास मिळत आहे. विशेषत: कुटुंबाला वर्षभर पुरेल इतक्या तिखटाची एकाचवेळी तरतुद केली जाते. त्यामुळे मिरची खरेदीला वेग येऊ लागला आहे. येत्या दिवसात पुन्हा मिरचीची खरेदी वाढणार आहे. जसजसा उन्हाळा जवळ येईल तसतसे मिरचीची खरेदी वाढणार आहे. विशेषत: व्यावसायिकांबरोबर घरगुती तिखटासाठी महिलांकडून मिरचीची खरेदी होणार आहे. विशेषत: बॅडगी आणि संकेश्वरी मिरचीची खरेदी वाढणार आहे. गत दोन वर्षाचा विचार करता यंदा मिरचीचा भाव मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याचे बोलले जात आहे.