4 राज्यांमध्ये ‘सितरंग’संबंधी रेड अलर्ट
आसाम-बंगालमध्ये मुसळधार पाऊस ः मेघालय-मिझोरममध्ये जोरदार वारे
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
बांगलादेशच्या किनारी क्षेत्राला धडकल्यावर सितरंग चक्रीवादळाने भारतात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यात आहे.
त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपूर आणि नागालँडमध्ये 100-110 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत आहेत. तर पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामच्या अनेक जिल्हय़ांमध्ये मुसळधार पावसास सुरुवात झाली आहे. गुवाहाटीत मंगळवारी पावसानंतर रस्ते जलमय झलो आहेत. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याचा निर्देश दिला आहे.
तत्पूर्वी सितरंग चक्रीवादळाने सोमवारी बांगलादेशात मोठे नुकसान घडवून आणले आहे. चक्रीवादळामुळे बांगलादेशात 11 जणांना जीव गमवावा लागला आहे. तेथील बरगुना, नारेल, सिराजगंज आणि भोला या जिल्हय़ांमध्ये जीवितहानी झाली आहे.
हवामान विभागानुसार बांगलादेशात सितरंग चक्रीवादळ कमजोर पडू लागले आहे. सितरंग चक्रीवादळाने 25 ऑक्टोबर रोजी सकाळी तिनकोना बेट आणि बारिसल नजीकच्या भागादरम्यान बांगलादेशचे किनारी क्षेत्र ओलांडले आहे. 24 ऑक्टोबर रोजी रात्री चक्रीवादळाचे केंद्र ढाका शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावरील किनारी क्षेत्रात होते.
7 राज्यांमध्ये अलर्ट
तत्पूर्वी हवामान विभागाने 7 राज्यांसाठी अलर्ट जारी केला होता. त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपूर, पश्चिम बंगाल आणि नागालँड यांचा यात समावेश होता. याचबरोबर ओडिशातही चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. सितरंग चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव सुंदरवन आणि पूर्व मिदनापूरच्या किनारी भागांमध्ये मंगळवारी दिसून आला आहे.