कारवार जिल्ह्याच्या किनारपट्टीवर 12 ते 14 पर्यंत रेड अलर्ट
जोरदार वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता
कारवार : भारतीय हवामान खाते आणि कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती इनचार्ज केंद्र बेंगळूर यांच्याकडून दि. 12 ते 14 पर्यंत जिल्ह्याच्या किनारपट्टीवर रेड अलर्ट घोषित केला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्याकरिता जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यातील जनतेने खबरदारी घेण्याची सूचना करवार जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया यांनी केली आहे. प्रसिद्ध पत्रकात के. लक्ष्मीप्रिया यांनी 12 ते 14 जून या तीन दिवसांत किनारपट्टीवरील काही भागात जोरदार वारे वाहणार आहेत. जोरदार वाऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारतर्फे जनतेने आणि अधिकाऱ्यांनी खबरदारीसंदर्भात काही सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आणीबाणी कारवार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राकडून जिल्ह्यातील हवामान परिस्थितीबाबत आठवड्यातील 24 तास माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या सोशल मिडीया आणि प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिली जाणार आहे. जनतेने कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत माहितीवर किंवा अफवांवार विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, रेड अलर्ट घोषित केलेल्या दिवशी मच्छीमारी बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात न उतरण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाच्यावेळी किनारपट्टीवरील सखल प्रदेशापासून दूर रहावे. विशेष करून पालकांनी आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी. पर्यटकांनी समुद्रात उतरु नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.