लवकरच 18,500 शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात नव्याने 18,500 शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा यांनी केली. शाळांतील वर्गखोल्यांचे बांधकाम आणि दहावी परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे घेऊन शिक्षण क्षेत्र मजबूत बनविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी मंगळवारी चामराजनगरला भेट दिली. ते श्री नारायण गुरु जयंती कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर 13,500 शिक्षकाच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. मागील भाजप सरकारच्या कार्यकाळात केवळ 5,428 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. आमचे सरकार दर्जेदार शिक्षण देण्यास कटिबद्ध आहे. लवकरच आणखी 18,500 शिक्षकांची नेमणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यात अनुदानित आणि सरकारी शालेय शिक्षकांना समान प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.