महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सर्व प्रभागांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा

10:45 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरोग्य-शिक्षण स्थायी समितीच्या बैठकीत भटकी कुत्री, उद्यान, कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यावर जोरदार चर्चा

Advertisement

बेळगाव : शहरातील विविध समस्यांवर महानगरपालिकेतील आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे शहरातील उद्यानांना फलक नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. तेव्हा फलकांची उभारणी करा, अशी सूचना करण्यात आली. याचबरोबर काही प्रभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे वेळेत कचऱ्याची उचल, तसेच इतर कामे होत नाहीत. तेव्हा कमी असलेल्या प्रभागांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा, अशी सूचना बैठकीत केली आहे. शनिवारी महापालिकेतील आरोग्य व शिक्षण स्थायी समितीची बैठक चेअरमन रवी धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी आपल्या प्रभागातील समस्या नगरसेवकांनी मांडाव्यात, अशी सूचना करण्यात आली. काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागामध्ये असलेल्या समस्या सांगितल्या. त्या समस्या तातडीने दूर करा, असे प्रभागाच्या स्वच्छता निरीक्षकांना सांगण्यात आले.

Advertisement

कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

शहरातील सर्वच प्रभागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. त्यावर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून शस्त्रक्रिया करावी, अशी सूचना केली आहे. कुत्र्यांचा वावर वाढल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा तातडीने याकडे लक्ष द्या आणि नियंत्रण ठेवा, असे सांगण्यात आले.

बैठकीला उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावणार

गेल्या काही बैठकांना स्वच्छता निरीक्षक उपस्थित राहिले नाहीत. काहीतरी कारण सांगून जाणूनबुजून बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे त्यांना नोटिसा द्या, अशी सूचना चेअरमन रवी धोत्रे यांनी केली आहे. त्यावर अधिकाऱ्यांनी निश्चितच त्यांना नोटीस देण्यात येईल, असे सांगितले.

स्मशानभूमीतील स्वच्छता करा

मजगाव परिसरातील स्मशानभूमीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्या स्मशानभूमीची स्वच्छता करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. याचबरोबर इतर स्मशानभूमीमध्येही अस्वच्छता पसरली आहे. ती तातडीने दूर करा, असे सांगण्यात आले.

‘त्या’ सर्व कामगारांना बुधवारी बोलवा

नव्याने 150 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची कोणालाच ओळख नाही. त्यामुळे बुधवारी त्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवावे, अशी सूचना   करण्यात आली. त्यांची ओळख नसल्यामुळे आपल्या वॉर्डात कोण काम करत आहे, हे देखील समजणे अवघड झाले आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना त्यांची कोणत्या वॉर्डामध्ये नेमणूक केली आहे याची माहिती द्यावी, अशी सूचना केली आहे. क्रीडापटूंना गौरवधन देण्याबाबत चर्चा करण्यात आली. याचबरोबर त्याला मंजुरी देण्यात आली. जुन्या महापालिका कार्यालय आणि सध्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव्याने ग्रंथालय सुरू करण्याचा प्रस्ताव नगरसेवक शंकर पाटील यांनी पुन्हा एकदा मांडला. त्यावर येत्या कौन्सिलमध्ये चर्चा करून टेंडर काढण्याबाबत सूचना करण्यात आली. या बैठकीला सत्ताधारी गटाचे नेते राजशेखर डोणी, नगरसेवक श्रेयश नाकाडी, आनंद चव्हाण यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते. उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी बैठकीचा अजेंडा मांडला. या बैठकीला आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुदत संपलेल्या कामांचे पुन्हा टेंडर काढणार

सफाई कंत्राटदाराच्या कंत्राटाची मुदत संपली आहे. त्यांना पुन्हा कंत्राट द्यायचे की नाही, याबाबत आरोग्य व शिक्षण स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. नव्याने टेंडर प्रक्रिया राबवून त्या कंत्राटदाराचे काम थांबवावे, अशी सूचना आरोग्य व शिक्षण स्थायी समितीचे चेअरमन रवी धोत्रे यांनी महानगरपालिका उपायुक्तांना केली आहे. कंत्राटदार सी. के. पाटील यांच्याबद्दल तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांच्या टेंडरची मुदत संपली असून नव्याने टेंडर मागवावे, असे सांगण्यात आले. नवीन टेंडर जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडेच काम सोपविण्याबाबतही या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

सायंकाळी कचऱ्याची उचल न केलेल्यांना नोटीस द्या

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी दोनवेळा कचऱ्याची उचल करण्यात येत होती. मात्र अचानकपणे सायंकाळी कचरा उचल करण्याचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने ब्लॅकस्पॉट निर्माण झाले आहेत. तेव्हा ज्या स्वच्छता निरीक्षकांनी सायंकाळी कचरा उचलण्याचे काम थांबविले आहे त्यांना नोटीस बजावावी, असे या बैठकीत ठरविण्यात आले. मनपा आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्या विरोधातही राज्याच्या नगरविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. 23 जणांनी ट्रेड लायसेन्ससाठी अर्ज केले होते. मात्र त्यांना ट्रेड लायसेन्स देण्यात आले नाही. याबद्दल आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांना तुम्ही राजकीय दबावाखाली काम करता का? असा प्रश्न उपस्थित करत मनपा आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांच्या विरोधात तक्रार पाठविण्याचे ठरविण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article