थकबाकीपेक्षा अधिक वसुली : विजय मल्ल्या उच्च न्यायालयात
प्रतिनिधी/ बेंगळूर
किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्जवसुलीच्या प्र्रक्रियेला उद्योजक विजय मल्ल्या यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बँकेतील थकबाकीपेक्षा अधिक वसुली केल्याचा ठपका विजय मल्ल्या यांनी ठेवला आहे. कर्जाची रक्कम आणि वसुली केलेल्या एकूण रकमेची माहिती देण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, अशी याचिका त्यांनी वकिलांमार्फत केली आहे. दरम्यान, न्यायालयाने या संदर्भात बँकांना नोटीस बजावली आहे. किंगफिशर एअरलाईन्सचे 6,200 कोटी रुपये कर्ज थकीत असताना बँक अधिकाऱ्यांनी मूळ कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक पटीने वसुली केली आहे, असा युक्तिवाद विजय मल्ल्यांचे वकील वकील सज्जन पुवय्या यांनी केला असून पुढील वसुली प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी विनंती केली आहे.
3 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती आर. देवदास यांनी सुनावणी केली. मल्ल्या यांच्यावतीने वकील सज्जन पुवय्या यांनी कोणतीही अंतरिम भरपाई मागितलेली नाही, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकेसह 10 बँका, वसुली अधिकारी आणि याचिकेत उल्लेख केलेल्या मालमत्तांचे पुनर्निर्माण करणाऱ्या कंपन्यांना नोटीस बजावली असून सुनावणी 19 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये कर्जवसुली लवादाने निकाल दिलेल्या 6,203 कोटी रुपयांपेक्षा दुप्पट वसुली बँकांनी केली आहे, असा आरोप विजय मल्ल्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. मल्ल्या यांची 14,131.6 कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी पुनर्संचयित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले होते. या मुद्द्याचा उल्लेखही याचिकेत करण्यात आला आहे.