ऑईलची उर्वरित रक्कम संबंधित कंपनीकडून वसूल करा
कोल्हापूर :
शेतकरी सहकारी संघाच्या पेट्रोलपंपावरील ऑईल निम्म्या किंमतीला खरेदी केलेल्या कंपनीकडून ऑईल परत न घेता ऑईलची उर्वरीत रक्कम वसूल करावी, असा निर्णय शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच संघाचे कार्यकारी संचालक ए. आर. मुल्ला यांनी चहापूड खरेदीच्या मुळ किंमतीपेक्षा दहा हजार रुपये ज्यादा देऊन खरेदी केली आहे. त्यामुळे चहापूड खरेदीलाही संचालकांनी मंजूरी दिली नाही.
शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाची शनिवारी बैठक झाली. बैठकीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होईल अशी अपेक्षा होती. मात्र या बैठकीमध्येही त्यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ऑईल खरेदी, चहापूड खरेदी व्यवहार, कार्यकारी संचालक यांना पदमुक्त करा आदी मुद्यांवर बैठीकमध्ये चर्चा झाली.
शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपवरील ऑईल विक्री करताना संचालक मंडळाची मंजूरी घेणे अपेक्षित असते. मात्र अध्यक्षांनी स्वत:च्या अधिकारात मुळ किंमतीच्या चाळीस टक्के दराने ऑईलची विक्री केली आहे. ऑईल विक्रीच्या या व्यवहारास संचालक मंडळाने मंजूरी दिलेली नाही. 50 टक्के रक्कम देवून ऑईल परत करण्याची तयारी संबंधित कंपनीने दर्शवली आहे. मात्र शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ऑईल परत न घेता संबंधित कंपनीकडून ऑईलची उर्वरीत रक्कम घेण्याबाबत निर्णय झाला.
- जादा दराच्या चहापूड खरेदीस मंजुरी नाही
संघाचे कार्यकारी संचालक मुल्ला यांनी संघाच्या शाखांमध्ये विक्रीसाठी चहापूड खरेदी केली आहे. चहापूड खरेदी करताना खरेदीच्या मुळ किंमतीपेक्षा दहा हजार रुपये ज्यादा देऊन चहापूड खरेदी केल्याचे काही संचालकांनी बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिले. त्यामुळे ज्यादा रक्कम देवून केलेल्या चहापूड खरेदीस संचालक मंडळाने मंजूरी दिली नाही.
- कार्यकारी संचालकांना पदमुक्त करा
कार्यकारी संचालक यांच्याकडुन संघाचे अधिकारी, कर्मचारी यांना एकेरी भाषा वापरत अरेरावी केल्याच्या तक्रारी होत असल्याने मागील बैठकीत कार्यकारी संचालकांच्या अरेरावीला आवर घालण्याची मागणी संचालकांनी केली होती. मात्र हा प्रकार सुरु असून त्यांच्याकडून मनमानी कारभार सुरु असल्याने कार्यकारी संचालक मुल्ला यांना पदमुक्त करण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. यावर संचालकांचे एकमत झाल्याचे समजते.