इच्छाशक्तीच्या जोरावर विक्रमांना गवसणी
ज्योती व विहान यांनी रचला नवा विक्रम
बेळगाव : एक सरकारी अधिकारी जर मनात इच्छाशक्ती बाळगली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, याचे एक जिवंत उदाहरण गुरूवारी जेएनएमसीच्या आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात आरोग्य व बालकल्याण खात्याच्या वरिष्ठ अधिकारी ज्योती कोरी व त्यांचा चिरंजीव विहान कोरी यांनी सतत 12 तास रिले जलतरण करुन नवीन विक्रम नोंदविला आहे. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. स्विमर्स व अॅक्वेरियस क्लबच्या मान्यतेनुसार शिक्षकदिनाचे औचित्य साधून ज्योती कोरी व विहान कोरी या दोघांनी गुरूवारी पहाटे 5 वाजता या विक्रमाला प्रारंभ केला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत जेएनएमसीच्या जलतरण तलावात हा नवा विक्रम नोंद केली. ज्योती व विहान यांनी दिवसभर सुरू असलेल्या उन, पाऊसाचा मारा सहन करत या विक्रमाला गवसणी घातली.
ज्योती कोरी या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या तांत्रिक अधिकारी आहेत. त्यांना लहानपणापासून पोहण्याची आवड होती. पण काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. विवाहानंतर त्यांनी आपला पोहण्याचा छंद जोपासला. त्याचवेळी त्यांची बेळगावात आरोग्य व बालकल्याण खात्याच्या कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाल्या. या सर्व कारकिर्दीत आपले पती शिवकुमार कोरी व मुलगा पृथ्वी व विहान यांची मोलाची साथ लाभली. आपली पोहण्याची आवड त्यांनी जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी यांना सांगितली. कलघटगी यांनी त्यांना प्रोत्साहन देवून पुढील जलतरण प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रशिक्षणाला प्रारंभ केला.
सरकारच्या जलतरण स्पर्धेतून ठिकठिकाणी भाग घेवून अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केले. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवत त्यांनी वरील विक्रम नोंदविण्याची इच्छा होती. विक्रमानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी राकेशसिंग, श्रेयश नाकाडी, सचिन हंगिरगेकर, उदयसिंग रजपूत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला. ज्योती कोरी यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर व इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.