गव्हाच्या उत्पादनात विक्रम शक्य
भारत यावर्षी गव्हाच्या उत्पादनामध्ये विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये गव्हासाठी योग्य तो मोसम दिसून आला होता. गेल्या 100 वर्षांमध्ये पाहता फेब्रुवारी हा महिना सर्वाधिक उष्ण म्हणून गणला गेला. गहू तयार होण्यासमयी वातावरण चांगले राहिल्याने उत्पादन चांगले येणार असल्याचेही बोलले जात आहे. भारतीय गहू आणि संशोधन संस्थेचे संचालक रतन तिवारी यांच्यामते यावर्षी गव्हाच्या उत्पादनासाठी उत्तम हवामान राहिले होते. गव्हाच्या पिकाला कोणत्याही प्रकारचा किडीचा प्रादुर्भाव कोठेही झालेला पहायला मिळाला नाही.
अवेळी येणाऱ्या पावसाचा गव्हाला फटका बसला नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांनी देखील हवा पाण्याला उपयुक्त अशा बियाणांची पेरणी केली होती. त्याचप्रमाणे जास्तीचे उत्पादन देणाऱ्या बियाणांची पेरणी केल्यामुळे यंदा गहू उत्पादनामध्ये विक्रमी वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्याला गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून या अनुषंगाने पीठ गिरणी मालकांनी सरकारकडे गव्हावरील निर्यात बंदी उठविण्याची मागणी केली आहे. रोलर फ्लोर मिलर्स फेडरेशन
ऑफ इंडियाचे अध्यक्ष नवनीत चितलिंगय्या यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यापर्यंत संस्थेने आयात करामध्ये कपात करण्याची मागणी केली होती. कारण त्यांना पिक कितपत येईल, याची चिंता होती. पण आता गव्हाचे उत्पादन चांगले आले आहे. सरकारी गोदामे गव्हाच्या साठ्यांनी भरली असून खासगी व्यापाऱ्यांकडेदेखील मोठ्या प्रमाणात गव्हाचा साठा आहे. अशावेळी सरकारने गहू उत्पादकांना निर्यातीसाठी परवानगी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील कृषी विभागाच्या अंदाजानुसार भारतामध्ये यंदा गव्हाचे उत्पादन 117दशलक्ष टनावर पोहोचू शकते. तसे झाल्यास हा सर्वाधिक उत्पादनाचा विक्रम असेल. याप्रकारे पाहता मोसमाच्या शेवटी गेल्या चार वर्षांमध्ये पाहता सर्वात जास्त गव्हाचा साठा राहू शकेल. गव्हाच्या उत्पादनात वाढ पाहता सरकारने जर का निर्यातीला परवानगी दिली तर जगभर याचा परिणाम गव्हाच्या किंमतीवर पडू शकतो. आतापर्यंत पाहता याच महिन्यात जागतिक स्तरावर गव्हाच्या किमतीत 3 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. भारतामध्ये पाहता यामुळे खाण्या पिण्याच्या वस्तूंसंबंधातील महागाई कमी होऊ शकते.
भारताने 2022 मध्ये गव्हावर निर्यात बंदी लागू केली होती. त्याचवर्षी मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट होती या लाटेत गव्हाचे पिक बऱ्याच अंशी करपले. परिणामी उत्पादनामध्ये घसरण दिसून आली. परंतु यावर्षी तसे काही झालेले अनुभवायला आलेले नाही. गहू उत्पादन करणाऱ्या अधिकतर राज्यांमध्ये तापमान जास्त करून प्रमाणाबाहेर वाढले नव्हते. हेच वातावरण गहू उत्पादन वाढीला पोषक पहायला मिळाले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितल्यानुसार सरकारची एजन्सी असणाऱ्या भारतीय खाद्य निगमने आतापर्यंत 29.6 दशलक्ष टन गहू खरेदी केला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये खरेदीचे प्रमाण 14 टक्के अधिक आहे. यावर्षी गव्हाची सरकारी खरेदी 32.5 दशलक्ष टनपर्यंत पोहोचू शकते. खाद्यमंत्रालय भारतातील गव्हाच्या एकंदर उत्पादनाचा सारासार विचार करून भारतातील गव्हाची गरज, मागणी याबाबी लक्षात घेऊन गव्हाची निर्यात करायची की नाही, या संबंधीचा निर्णय सरकार घेईल, असेही जोशी यांनी म्हटले आहे.
दीपक कश्यप