पीकहानीची योग्यरित्या नोंद करा
पालकमंत्री जारकीहाळी यांची अधिकाऱ्यांना सूचना : यरगट्टी-रामदुर्ग तालुक्याचा दौरा
पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी यरगट्टी व रामदुर्ग तालुक्यांचा दौरा केला. या दोन्ही तालुक्यातील पीकहानीची लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. पीकहानीचे प्रमाण किती आहे, याची व्यवस्थितपणे नोंद करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : यरगट्टी तालुक्यातील कुरुबगट्टी येथील शेतजमिनींना भेटी दिल्या. विविध पिकांच्या झालेल्या हानीची त्यांनी पाहणी केली. रेवाप्पा चिक्कण्णावर या शेतकऱ्याचे मूग पीक वाळले आहे. याच गावातील शांतव्वा चिक्कोडी यांच्या भुईमूग पिकाचेही नुकसान झाले आहे. गंगाधर उळ्ळीगड्डी यांच्या जमिनीतील मका पीकही वाळून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
होन्नाप्पा पुजेर व चन्नाप्पा उळ्ळीड्डी यांच्या शेतजमिनीतील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना सामना करावा लागत असलेल्या समस्यांविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर रामदुर्ग तालुक्यातील इटनाळला भेट देऊन शंकऱ्याप्पा कोप्पद यांच्या शेतातील उडीद पिकाच्या हानीची पाहणी केली. पावसाअभावी पिकांची वाढ होत नाही. यंदा हातचे पीक गेले आहे, अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.
हुलकुंद येथील इंद्रकुमार पाटील यांचे कापूस पीक, लालसाब नदाफ यांच्या जमिनीतील मूग पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. पीकहानी संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा केली. चिप्पलकट्टी येथील सुरेश कौजलगी यांच्या जमिनीतील मूग, तूर व कांदा पिकाची हानी झाली आहे. प्रमोद शिंगारू यांच्या शेतातील कांदाही वाळला आहे. बिजगुप्पी येथील पुंडलिक बजंत्री, दुंडाप्पा पाटील यांच्या शेतातील कापूस, अडव्याप्पा पाटील व विरुपाक्षी यांच्या शेतातील कांदा वाळून गेला आहे. कदामपूर येथील बसवराज हल्लोळी यांच्या शेतातील मूग व गुरुसिद्धप्पा नरगुंद, इरनगौडा पाटील यांच्या शेतातील कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
पावसाअभावी वाळलेले पीक, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या वास्तवाची नोंद करून शासकीय मार्गसूचीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार अशोक पट्टण, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, कृषी खात्याचे एच. डी. कोळेकर, यरगट्टीचे तहसीलदार एम. व्ही. गुंडप्पगोळ यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी, स्थानिक नेते, शेतकरी त्यांच्यासोबत होते.
नुकसान...!
मूग, मका आणि भुईमूग पिकाचेही नुकसान
पावसाअभावी अनेक पिकांची वाढ खुंटली