काळमवाडीत 70 गुंठ्यात 167 टन विक्रमी ऊस उत्पन्न
कासेगाव :
वाळवा तालुक्यातील काळमवाडी येथील प्रगतशील शेतकरी व कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सुनील मारुती साळुंखे यांनी 70 गुंठे क्षेत्रात 167 टन इतके उच्चांकी उत्पादन घेतले. गेल्या वर्षीची दुष्काळी परिस्थिती व यावर्षी अतिवृष्टी अशी प्रतिकूल हवामान परिस्थितीतही केवळ तंत्रज्ञानाचा वापर, जिद्द, कुटुंबातील लोकांचे सहकार्य या जोरावर त्यांनी उत्पादन मिळवले.
साळुंखे यांच्याकडे स्वत:ची दहा एकर शेती आहे. दरवर्षी सुमारे 250 ते 300 टन ऊस निघतो. त्याचबरोबर कलिंगड, वांगी यांचेही त्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. लागण करण्यापूर्वी त्यांनी गव्हाचे पीक घेतले होते. गहू काढून नांगरट व रोटर मारून कारखान्याची मळी विस्कटून घेतली. त्यानंतर रोटर मारून चार फुटावर सरी तयार करून घेतली. 86032 ऊसाची लागवड केली. ऊस पिक दहा महिन्याचे झाल्यावर वाळलेला पाला काढून सरीत आच्छादन केले. त्यानंतर ड्रोन च्या साह्याने औषध फवारणी करून घेतली उसाची तोड आली.
तोडणी अखेर ऊसाला सरासरी 52 कांड्या होत्या तर एका उसाचे वजन सरासरी तीन किलो होते. जादा वजनाचा ऊस मिळाल्यामुळे ते या विक्रमी उत्पादनापर्यंत पोहोचू शकले. या विक्रमी उत्पादनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा स्वत:चा ऊस शेतीतील अनुभव व राहुल मुळीक, हणमंत साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
- तंत्रशुद्ध पद्धतीने शेतीमुळे यश
सध्याच्या काळात शेती आव्हानात्मक झाली आहे. पारंपारिक शेती सोडून नवीन तंत्रज्ञान आणि तंत्रशुद्ध पद्धतीने शेती केली तरच यश मिळेल. शेतीमध्ये कोणतेही पीक घेताना पिकाचे व्यवस्थापन हा शेती व्यवसायातील मुख्य गाभा आहे.
- सुनील मारुती साळुंखे, शेतकरी काळमवाडी