सप्टेंबरमध्ये 25 लाखांहून अधिक वाहनांची विक्रमी विक्री
वाहन क्षेत्रात विक्रमाची नोंद : फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनची माहिती
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सप्टेंबर 2026 भारतीय ऑटोमोबाईल बाजारासाठी शुभसंकेत देत आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (फाडाच्या) ताज्या आकडेवारीनुसार, देशातील ऑटो रिटेल विक्रीने सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. सणासुदीचा हंगाम आणि जोरदार मागणीमुळे ऑटो क्षेत्राने वार्षिक 31.82 टक्के वाढ नोंदवली आहे.
सर्व विभागांमध्ये प्रचंड वाढ
सप्टेंबरमधील एकूण ऑटोमोबाईल रिटेल विक्री 25,36,920 युनिट्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 31.82 टक्के जास्त आहे. प्रवासी वाहनांबद्दल बोलायचे झाल्यास, यांची विक्री 32.1 टक्केने वाढून 4,27,213 युनिट्सवर पोहोचली. त्याच वेळी, दुचाकी विभागातही 33.08 टक्केची जोरदार वाढ दिसून आली, जिथे एकूण 17,90,188 वाहनांची विक्री झाली. याशिवाय, व्यावसायिक आणि तीनचाकी विभागातही अनुक्रमे 37.62 टक्के आणि 22.25 टक्के वाढ नोंदवली गेली.
सप्टेंबर महिना विशेष का?
फाडाचे अध्यक्ष साई गिरीधर यांच्या मते, ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या ‘बेस डिस्टॉर्शन’चा परिणाम आहे. वास्तविक पाहता, गेल्या वर्षी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात, जीएसटी 2.0 लागू होण्याच्या भीतीमुळे ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलली होती, ज्याचा परिणाम या वर्षीच्या वाढीमध्ये दिसून येत आहे. तथापि, हे वगळल्याससुद्धा, आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण विक्री 1.55 कोटी वाहनांपेक्षा जास्त झाली, जी सुमारे 20.77 टक्केचा वास्तविक वाढीचा दर दर्शवते.
पेट्रोल विरुद्ध पर्यायी इंधन
या महिन्याच्या आकडेवारीतील सर्वात धक्कादायक बदल इंधन मिश्रणात दिसून आला. आता पेट्रोल आणि पर्यायी इंधनांची (सीएनजी, हायब्रीड आणि ईव्ही) विक्री जवळपास समान झाली आहे. पेट्रोल वाहनांचा वाटा 41.27 टक्के होता, तर पर्यायी इंधनांचा वाटा जवळपास 41 टक्के पर्यंत पोहोचला. यावरून असे दिसून येते की भारतीय ग्राहक आता वेगाने ईव्ही आणि हायब्रीड वाहने स्वीकारत आहेत.
