2 वर्षात दूरसंचार क्षेत्रातून विक्रमी महसूल होणार प्राप्त : मनीष सिन्हा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील दोन वर्षाच्या कालावधीत दूरसंचार क्षेत्राच्या व्यवसायातून 5 ट्रिलियन रुपये इतका महसूल प्राप्त केला जाणार असल्याची माहिती दूरसंचार विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये व्यवसाय वाढीसाठी नेटाने केलेल्या प्रयत्नांमुळे वरील उद्दिष्ट साध्य केले जाणार असल्याची माहिती आहे.
दूरसंचार क्षेत्रातील डिजिटल कम्युनिकेशन कमिशनचे सदस्य मनीष सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे. स्पेक्ट्रमच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्राला गती घेणे शक्य झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमधील दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीकारक कामगिरी पाहता पुढील दोन वर्षात या क्षेत्राकडून जास्तीत जास्त महसूल प्राप्त केला जाईल. 5 जी सेवेचा वाढता वापर त्याचप्रमाणे एआयचे वाढते अस्तित्व यामुळे दूरसंचार क्षेत्राला याचा लाभ होऊ शकणार आहे. या अनुषंगाने पाहता पुढील दोन वर्षांमध्ये पाच ट्रिलियन पर्यंतचा महसूल या क्षेत्रांमधून प्राप्त होईल असेही त्यांनी सांगितले.
याआधीच्या वर्षातली कामगिरी
आर्थिक वर्ष 2024 मध्ये दूरसंचार सेवा प्रदात्यांच्यामार्फत 3.36 ट्रिलियन रुपये इतका महसूल प्राप्त करण्यात आला होता. यावर्षी 4 ट्रिलियन रुपयांपर्यंतचा महसूल प्राप्त केला जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. तर पुढील 2 वर्षात 5 ट्रिलियनचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.