विक्रमी पर्जन्यमान आणि बदलते हवामान
गोव्यात परतीच्या पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि पहिल्याच तडाख्यात अवघ्या बारा तासात 4.16 इंच एवढे पर्जन्यमान नोंद झाले. राजधानी पणजीसह फोंडा, मडगाव, पेडणे, म्हापसा या प्रमुख शहरांना या परतीच्या पावसाने झोडपले. पणजी शहर तर जलमय होऊन बहुतेक रस्ते पाण्याखाली गेले. राज्यात यंदाच्या मोसमात सर्वाधिक 170 इंच अशा विक्रमी पावसाची नोंद झाली असून सरासरी 40 टक्के अधिक व 52 टक्के अतिरिक्त पाऊस झाल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
पश्चिमघाटाच्या पायथ्याशी असलेल्या सत्तरी व त्यालाच लागून असलेल्या सांगे, डिचोली तालुक्यात यंदा धुवांधार पावसासह काही ठिकाणी ढगफुटीही झाली. परतीच्या पावसाला नुकतीच सुरुवात झाली असून अजून तो किती दिवस लांबणार यावर गोव्यातील पर्यटनीय व अन्य व्यावसायिक गणिते अवलंबून आहेत.
यंदा मान्सूनचे आगमन काहीसे लांबले व जुलैच्या उत्तरार्धात बेसुमार पाऊस कोसळला. तब्बल वीस दिवस गोवेकरांना सूर्याचे दर्शन दुर्लभ झाले. एवढा कहर यंदाच्या पावसाने केला. गेल्या काही वर्षात गोव्यातच नव्हेतर देशभरात पर्जन्यमानात विचित्र बदल घडून आले आहेत. हवामान बदलाचे संकेत त्यातून मिळतात. गोव्यातील पाऊस तसा आल्हाददायक व सर्वांना हवाहवासा वाटणारा. हा अनुभव घेण्यासाठीच देशभरातील पर्यटकांना येथील मान्सून पर्यटन खुणावते मात्र येथील शेतकरीवर्ग व संवेदनशील गोवेकरांच्या मनात आता कुठेतरी या वऊणराजाबद्दल अनामिक भीती दाटून राहिली आहे. केवळ पर्जन्यमानच नव्हे हिवाळ्याचे चक्रही बदलले आहे.
ऑक्टोबर हिट केव्हाच गायब झाली असून थंडीचा मोसम चार महिन्यावरून जेमतेम एका महिन्यावर आला आहे. अंगाला हुडहुडी भरविणारी कडाक्याची थंडी गेल्या काही वर्षांत गोवेकरांनी अनुभवलेली नाही. उष्णतेचे प्रमाणही प्रमाणाबाहेर वाढले आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम गोव्यावरही दिसू लागले आहेत. यंदा काजू, आंब्याचे पीक 33 टक्क्यांनी घटले तर अतिपर्जन्यवृष्टीने रोपणापूर्वीच भातशेती गिळकृंत केली. सुपारी व भाजीमळ्यांची पडझड झाल्याने यंदा ओला दुष्काळच पडला. कृषी खात्यामार्फत सरकारने राज्यातील शेतकरी, मळेवाले व बागायतदारांना चतुर्थीपूर्वी नुकसानभरपाई देऊन थोडासा दिलासा दिला मात्र शेतीचे झालेले नुकसान न भरून येणारे आहे. राज्यातील शेतजमिनीचे क्षेत्रफळ झपाट्याने घटत चालले असून काँक्रिटची जंगले मात्र जलद गतीने वाढताना दिसतात. सुपिक जमिनी, माळराने आणि आता डेंगरांचे सपाटीकरणातून निसर्गरम्य गोव्याचे चित्र पालटत आहे. निसर्गाच्या होणाऱ्या ऱ्हासात हवामान बदलाची कारणे दडली आहेत, हेच त्यातून ठळकपणे जाणवते.
गेल्या काही वर्षांत परतीच्या पावसाचा मुक्काम दसरा दिवाळीपर्यंत लांबत आहे. कधी नाताळातही तो बरसतो. पर्जन्यमानाच्या बदलत्या ऋतुचक्रामागे सृष्टीचे आर्त पर्यावरणप्रेमी व हवामान तज्ञाशिवाय इतर कुणालाही ऐकू येत नाहीत. निसर्ग देवतेने गोव्याला सृष्टीसौंदर्याचे वरदान दिले आणि आता त्याचा प्रकोपही अनुभवास येत आहे. राज्यात प्रलयंकारी चक्रीवादळे, अवेळी होणारी अतिवृष्टी व महापूर येण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन वर्षांपूर्वी म्हादई, खांडेपार व पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या अन्य नद्यांनी आपली पातळी ओलांडली. या महापुरात नदीकाठावर वसलेल्या अनेक गावांची बेसुमार हानी झाली. तीस वर्षांनंतर गोव्याने अनुभवलेला हा प्रलय होता.
गोमंतकीयांना पावसाचा तसा कधीच कंटाळा येत नाही. उलट अप्रुपच अधिक. कितीही धो धो कोसळला तरी येथील जनजीवनावर त्याचा क्वचितच परिणाम व्हायचा. पण हल्ली पावसाने नवीनच रूप धारण केले आहे. त्याची रिमझिम ताल, श्रावणातील लपंडावाचा त्याचा खेळ कुठेतरी हरवलेला दिसतो. अरबी समुद्रात सातत्याने घोंघावणारी वादळे व त्याचा परिणाम पश्चिमघाटीत ढगफुटीमध्ये होत असल्याचे आता हवामानतज्ञ सांगू लागले आहेत. जुने गोवे व अन्य काही भाग आता गोव्याची चेरापुंजी बनले आहेत. वर्षांतील कुठल्याही ऋतुमध्ये मेघगर्जनेसह जलधारा कोसळणे ऋतुबदलाचे विपरित संकेत देतात. वन्यप्राण्यांचा लोकवस्तीकडे वाढलेला वावर या गोष्टीतून प्राण्यांचा अधिवास क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप झाल्याचे दिसून येते. बेसुमार रेती उपशामुळे नदीपात्रांचे आकार बदलले आहेत. त्यामुळे सुसरी-मगरी शेतीलगतच्या ओढ्या, नाल्यामध्ये स्थलांतरित झाल्या. वन्यप्राण्यांची जैविक साखळी बिघडून काही वन्यप्राणी व पक्षांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जवळपासच्या रानात दिसणारे कोल्हे व भालू कुठल्याकुठे गायब झाले असून याउलट अन्य काही प्राण्यांची संख्या बेसुमार वाढल्याने जैविक साखळीवर त्याचा परिणाम झालेला दिसतो.
वर्षाऋतुनंतर राज्यातील पर्यटन हंगामाला सुरूवात होते. जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा पर्यटनाची दारेही खुली होतात. कालोत्सव व जत्रांना सुरूवात होते. त्यावरही हल्ली पावसाचे ढग दाटू लागल्याने एक अनामिक भीती व्यावसायिकांमध्ये घर करुन राहिली आहे. गोव्यात सध्या जे सुरू आहे, ते पाहिल्यास माणसाला सृष्टी संहाराची जणू घाईच झाल्याचे दिसते. पर्यटनात निखळ आनंद नव्हे तर ओरबाडलेपणाची विकृती वाढत आहे.
गोव्यातील हे संभाव्य धोक्याचे संकेत पर्यावरण व हवामानतज्ञांनी दिले आहेत. पावसाचा लहरीपणा हा निव्वळ निसर्गाचा कोप नसून माणसामधील वाढलेला अतिरेकी हव्यास आहे. आता सरकारला ते गांभीर्याने घ्यावे लागेल. जनतेलाही पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशीलता दाखवून कृतीशील होण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आतुरता लावणारा, कवीमनांना ऊंजी घालणारा, निसर्गसौंदर्य खुलविणारा, जमिनीतून सोने पिकविणारा गोव्यातील पाऊस हरवलेला नाही... हरवत चालली आहे ती माणसामधील असंवेदनशीलता !
सदानंद सतरकर