For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाबळेश्वरमध्ये विकेंडला पर्यटकांची विक्रमी गर्दी

11:04 AM Jul 07, 2025 IST | Radhika Patil
महाबळेश्वरमध्ये विकेंडला पर्यटकांची विक्रमी गर्दी
Advertisement

प्रतापगड :

Advertisement

सलग आलेल्या शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचा विक्रमी जनसागर उसळला आहे. संततधार पाऊस, हिरवीगार वनराई, खळाळणारे धबधबे आणि दाट धुक्याच्या मनमोहक अनुभवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक या थंड हवेच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महाबळेश्वर परिसरातील निसर्ग अक्षरश: न्हाऊन निघाला आहे. सर्वत्र हिरवळ पसरली असून, वातावरण आल्हाददायक झाले आहे. वेण्णा लेक, लिंगमाळा धबधबा, आर्थरसीट पॉइं&ट, एलिफंट हेड पॉइंट यांसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची रिघ लागली आहे. कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा, थंडगार वाऱ्याचा अनुभव घेण्याचा आणि हिरव्यागार वनराईत फिरण्याचा मनसोक्त आनंद पर्यटक लुटत आहेत. विशेषत: तरुण आणि कुटुंबांसोबत आलेले पर्यटक या निसर्गरम्य वातावरणात छायाचित्रे काढून आठवणी कॅमेरात कैद करत आहेत.

  • महाबळेश्वर-प्रतापगड मार्गावरील निसर्गाचे विहंगम दृश्य

महाबळेश्वर-प्रतापगड रस्त्यावरही पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या मार्गावर दुथडी भरून वाहणारे छोटे-मोठे धबधबे, अनेक ठिकाणी कोसळणारे पाण्याचे प्रवाह आणि दाट धुक्याची चादर पर्यटकांसाठी एक वेगळाच अनुभव देत आहे. या मार्गावरील प्रत्येक वळणावर थांबून निसर्गाच्या या अप्रतिम दृश्यांचे अवलोकन करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने थांबत आहेत. अनेक ठिकाणी सेल्फी आणि फोटोग्राफीसाठी पर्यटकांची गर्दी होऊन क्षणभर वाहतूकही मंदावत आहे.

Advertisement

सकाळच्या वेळी आणि सायंकाळच्या सुमारास या रस्त्यावर दाट धुक्याची चादर पसरलेली असते, ज्यामुळे दृश्यमानता काही प्रमाणात कमी असली तरी, हे धुकं आणि आजूबाजूची हिरवीगार वनराई एक स्वप्नवत अनुभव देते. पावसाळ्यात निसर्गाचे हे रौद्र आणि तितकेच सुंदर रूप अनुभवण्यासाठी पर्यटक आवर्जून या मार्गाला पसंती देत आहेत.

स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना पर्यटकांच्या या वाढत्या संख्येमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाबळेश्वरमधील हॉटेल आणि रिसॉर्ट्स जवळपास पूर्णपणे भरले असून, पर्यटकांच्या गर्दीमुळे, मका, भुईमूग आणि इतर स्थानिक पदार्थांच्या स्टॉल्सवरही मोठी उलाढाल होताना दिसत आहे. स्थानिक वाहतूक आणि गाईड व्यवसायालाही या गर्दीमुळे मोठा हातभार लागत आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. प्रशासनाने पर्यटकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. महत्त्वाच्या पर्यटन स्थळी आणि वर्दळीच्या मार्गांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. पुढील काही दिवस ही गर्दी कायम राहण्याचा अंदाज असून, महाबळेश्वरचा निसर्ग पर्यटकांना भुरळ घालत आहे.

Advertisement
Tags :

.