For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांबरा यात्रेत भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी

12:29 PM May 20, 2024 IST | VISHAL_G
सांबरा यात्रेत भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी
Advertisement

गावात भक्तांचा महापूर : चार चाकी वाहनांचे मुतग्याला पार्किंग : दुचाकी वाहनांमुळेही वाहतुकीची कोंडी

Advertisement

सांबरा/वार्ताहर

रविवारी सांबरा येथे श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी भेट देऊन श्री देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सांबऱ्याला येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी होती. शनिवारप्रमाणेच रविवारीदेखील गावामध्ये भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. जणू गावात भक्तांचा महापूर आल्याचा प्रत्यय सर्वांना येत होता.

Advertisement

यात्रेमुळे शनिवारी बेळगाव-सांबरा रस्त्यावर झालेली गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने अवजड वाहनांसह चार चाकी वाहने दुसऱ्या रस्त्यावरून वळविल्याने रविवारी या मार्गावरील ताण काहीसा कमी झाला होता. टेम्पो, ट्रॅक्स यासह सर्व चार चाकी वाहनांसाठी मुतगे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर पार्किंगची सोय करण्यात आली होती. यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या बसेसही मुतगा येथेच थांबविण्यात येत होत्या. तेथून सर्व भाविक चालत सांबरा गाठत होते. त्यामुळे जणू पायी दिंडीच चालल्याचा भास सर्वांना होत होता. दुचाकीवरून येणाऱ्या भक्तांचीही संख्या मोठी होती. त्यामुळे बराच उशीर सांबरा येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. मारीहाळ स्टेशनचे पोलीस, रहदारी पोलीस व बाऊन्सर्स यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मारीहाळ पोलीस स्थानकाचे सीपीआय गुऊराज कल्याणशेट्टी, पीएसआय मंजुनाथ नाईक आदी परिस्थितीवर नजर ठेवून होते.

Record breaking crowd of devotees in Sambra Yatra

सांबरा : गदगेवर विराजमान श्री महालक्ष्मी देवी.

भक्तांची अलोट गर्दी

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री महालक्ष्मी देवीच्या गदगेच्या ठिकाणीही भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. येथे प्रति अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती. गदगेच्या ठिकाणी श्री महालक्ष्मीदेवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई, उपाध्यक्ष भरमगौडा पाटील, खजिनदार वाय. के. धर्मोजी, सदस्य नागेश देसाई, कल्लाप्पा पालकर, सदाशिव पाटील, प्रभाकर य•ाr, सिद्राई य•ाr, मनोहर जोई, ईराप्पा जोई यांच्यासह यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

गावांमध्ये रविवारीही स्नेहभोजनाचा बेत असल्याने घरोघरी पाहुण्यांची गर्दी दिसून येत होती. जितके भाविक जेवण करून जात होते तितकेच भाविक गावात दाखल होत होते. त्यामुळे रविवारी रात्री उशिरापर्यंत गावात गर्दी कायम होती. विमानतळ रस्त्याच्या बाजूला खेळण्याची दुकाने, पाळणे आदी मनोरंजनाचे साहित्य थाटण्यात आले होते. त्या ठिकाणी बालचमूंसह भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गावामध्ये जणू भक्तांच्या उत्साहाला उधाण आल्याचे भासत होते. यात्रेतील 60 फुटी रथ पाहून भाविक समाधान व्यक्त करत होते. रविवारीही नेटवर्क जामची समस्या कायम होती. त्यामुळे पाहुण्यांचे घर शोधण्यासाठी भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

 पर्यायी मार्गाचा वापर

बऱ्याच भाविकांनी अष्टे व सुळेभावीमार्गे सांबरा गाठणे पसंद केले. सुळेभावीमार्गे आलेल्या भाविकांनी बाळेकुंद्रीनजीक वाहने पार्क केली होती. मुतगा ते सांबरा या रस्त्याचाही अनेक भाविकांनी रविवारी वापर केल्याचे दिसून आले. गावातील गणेश नगर भागामध्ये दुपारी दोनच्या सुमारास वाहनांचा चक्काजाम झाला होता. अनेक दुचाकी रस्त्यावर अडकून पडल्या होत्या.

विमानसेवेवर परिणाम    

बेळगाव-सांबरा रस्त्यावर शनिवारी झालेल्या गर्दीमुळे विमान प्रवासी विमानतळावर वेळेवर पोहोचू शकले नव्हते. याचा परिणाम काही विमान फेऱ्यांवरही  झाला होता. यासाठी रविवारी वाहतुकीत बदल करण्यात आला होता. सांबरा विमानतळाकडे जाण्यासाठी खनगाव क्रॉस सुळेभावीमार्गे सोय करण्यात आली होती. तर सांबऱ्याहून सुळेभावी, खनगाव क्रॉसमार्गे बेळगावला जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला होता. त्यामुळे विमानसेवेवर रविवारी परिणाम जाणवला नाही. सदर यात्रा बुधवार दि. 22 मे पर्यंत चालणार असून बुधवारी सायंकाळी श्री महालक्ष्मी देवीचे सीमेकडे प्रस्थान झाल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे.

Advertisement
Tags :

.