रियल इस्टेट आयपीओंनी उभारली विक्रमी रक्कम
13600 कोटींची उभारणी: कोलियर्स इंडियाच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ मुंबई
2024 मध्ये रियल इस्टेट क्षेत्रातील आयपीओंच्या माध्यमातून जवळपास 13500 कोटी रुपये जमवण्यात आले आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये दुप्पट रक्कम उभारण्यात आली आहे.
रियल इस्टेट क्षेत्रामध्ये सकारात्मकता अधिक असून 2021 पासून आतापर्यंत 21 रियल इस्टेट कंपन्यांचे आयपीओ सादर करण्यात आले आहेत. या आयपीओंनी जवळपास 31 हजार 900 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. 2017 ते 2020 या कालावधीतील रकमेच्या तुलनेमध्ये सध्याची वरील ही रक्कम दुप्पट दिसून आली आहे. 40 टक्के रक्कम हाउसिंग फायनान्स कंपन्यांमार्फत उभारले गेले असून रिटचे प्रमाण 22 टक्के इतके आहे. याचदरम्यान रहिवासी विकासकांनी 5600 कोटी रुपये उभारले आहेत, मागच्या वर्षाच्या तुलनेत ही रक्कम दहापट जास्त असल्याचेही सांगितले जात आहे. कोलियर्स इंडियाचे वरिष्ठ संचालक आणि संशोधन प्रमुख विमल नादर यांनी सांगितले की, बीएसई रियल्टी इंडेक्स यावर्षी 30 टक्के इतका वाढलेला पाहायला मिळाला आहे. या निर्देशांकाची कामगिरी सेन्सेक्स निर्देशांकापेक्षाही चांगली झाली आहे. महत्त्वाची बाब ही की 2010 नंतर जवळपास 20 टक्के रियल इस्टेट आयपीओंनी 2024 मध्ये रियल्टी निर्देशांकालाही मागे टाकले आहे. यावर्षी 90 टक्केपेक्षा अधिक आयपीओ ओवरसबक्राईब झाले आहेत. बाजारातील सकारात्मक स्थिती आणि गुंतवणूकदारांचा विश्वास यामुळे आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
एकंदर 47 आयपीओ लिस्ट
कोलियर्स इंडिया यांनी केलेल्या पाहणीत वरील बाब समोर आली आहे. त्यांच्या अहवालात 13500 कोटी रुपये रियल इस्टेट कंपन्यांच्या आयपीओंनी उभारल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच रिटेल आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांची भागीदारी देखील रियल इस्टेट कंपन्यांमध्ये वाढलेली पाहायला मिळाली आहे. यामुळे कंपन्यांच्या नफाकमाईमध्ये वाढ होण्यासोबतच बाजारात विश्वसनीयता वाढली आहे. 2010 पासून आत्तापर्यंत 47 रियल इस्टेट कंपन्यांचे आयपीओ लिस्ट झाले आहेत. ज्यांच्यामार्फत 2021 नंतर 30000 कोटी रुपये उभारण्यात आले आहेत. घरांची वाढीव मागणी, तसेच भाडेतत्त्वावरील कार्यालयांच्या मागणीत झालेली वाढ व पर्यटनात झालेली वृद्धी या कारणास्तव ही वाढ नोंदली असल्याचे कोलियर्स इंडिया यांच्या अहवालात दिसून आली आहे.