Radhanagari Election : राधानगरी तालुक्यात विक्रमी 79.37 टक्के मतदान, मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष
राधानगरी तालुक्यात महिला मतदारांचा मोठा सहभाग
राधानगरी (महेश तिरवडे ) : राधानगरी तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला असून 79.37 टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. यामध्ये 73,032 पुरुष तर 65,304 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण 1,38,341 मतदारांनी आपला कौल दिला आहे.
आता उद्या सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राशिवडे, कसबा वाळवे, सरवडे, कसबा तारळे व राधानगरी या गणांची मतमोजणी सकाळी 10 वाजता मराठी शाळा क्रीडा संकुल येथे सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी 15 ईव्हीएम मशीन तसेच पोस्टल मतदानासाठी 5 टेबल व सर्व मतदारसंघासाठी 20 फेऱ्या अशी एकूण 16 टेबलांवर मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी 32 कर्मचारी नेमण्यात आले असून, इतर सहाय्यक कर्मचारीही या प्रक्रियेत सहभागी असणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रत्येक उमेदवारासाठी प्रत्येक टेबलसाठी एक प्रतिनिधी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी अनिता देशमुख यांनी दिली. मतमोजणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.