थोर लोकांचे कर्म धर्माचरण म्हणून मान्यता पावते
अध्याय तिसरा
भगवंत म्हणाले, जो मनुष्य निरपेक्षपणे, स्वधर्माचे आचरण काया, वाचा, मनाने करत राहतो तो आपोआपच संपूर्ण निस्वार्थी होतो. त्याला आत्मस्वरूपाची ओळख होते. तो आत्मानंदाने तृप्त व संतुष्ट असतो, त्याला कोणतेही कर्तव्य कर्म राहत नाही. तो केवळ एक कर्तव्य म्हणून निर्लेप होऊन कर्मे करत असतो. कर्म केल्याने वा न केल्याने त्याला काही लाभ हानी होत नाही. त्याला कुणाकडून काही लाभ मिळवायचाही नसतो. आत्मज्ञान होईपर्यंत कर्म व इतर साधने मुद्दामहून करावी लागतात. आत्मज्ञान झाल्यावर ती ईश्वरी प्रेरणेने आपोआप घडतात. आत्मज्ञानाने आपण म्हणजे हा देह नसून आत्मा आहोत हे लक्षात येते. जो कर्मफळाविषयी सदैव अनासक्त राहून उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म करतो, त्याला कैवल्यपद मिळते.
पुढील श्लोकात भगवंत जनक महाराजांच्यासारख्या कर्मयोगी व्यक्तीचे उदाहरण देऊन सांगतात, आसक्तीरहित कर्म करूनच जनकादिकांना सिद्धी प्राप्त झाली. यासाठी तू सुद्धा लोकसंग्रहाकडे, लोकहिताकडे लक्ष देऊन कर्म करणे योग्य आहे.
कर्म-द्वारा चि सिद्धीस पावले जनकादिक । करी तू कर्म लक्षूनि लोक-संग्रह-धर्म हि ।। 20 ।।
श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ज्याप्रमाणे सूर्य कर्तव्य म्हणून तेजाने कायम तळपत असतो आणि त्याबद्दल त्याला कुणाकडून कोणतीही अपेक्षा नसते त्याप्रमाणे आत्मस्वरुपाची ज्याला ओळख झालेली आहे तो त्याच्या वाट्याला आलेली कर्मे केवळ एक कर्तव्य म्हणून निस्वार्थपणे करत असतो. ह्या त्याच्या वर्तणूकीमुळे तो जेथे असतो तेथेच मोक्षपद निर्माण होते. म्हणून तू सदैव कर्मफळाविषयी अनासक्त राहून उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म कर म्हणजे मोक्षपद मिळेल. आसक्तीरहित कर्म करूनच जनकादिकांना सिद्धी प्राप्त झाली हे लक्षात घेऊन तू सुद्धा लोकसंग्रहाकडे, लोकहिताकडे लक्ष देऊन कर्म करणे योग्य आहे. अशी आस्था तू ठेवलीस तर त्या आस्थेचा आणखी एक उपयोग होणार आहे. तू निरपेक्षतेने कर्माचे आचरण करत असताना तुझ्याकडे पाहून लोकांना तसे वागावेसे वाटेल आणि कर्म टाळल्याने आपण आपले कर्तव्य निभावले नाही म्हणून वाईट वाटणार नाही. अशा पद्धतीने माणसाने शेवटपर्यंत कर्म करावे. अगदी निष्काम स्थितीला पोहचलेल्या, निरिच्छ झालेल्या महान पुरुषांनादेखील लोकांना सदाचाराचा मार्ग दाखवण्यासाठी कर्म करावे लागते. आंधळ्या माणसाला सांभाळून नेणारा डोळस माणूस हा आंधळ्या माणसाच्या गतीने सावकाश चालत असतो, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाने, अज्ञानी माणसाच्या कलाकलाने घेऊन, सदाचार आणि धर्माचे आचरण करून त्याला मार्ग दाखवावा. ज्ञानी माणसानी धर्माचे आचरण करून दाखवून, धर्माचा मार्ग सांगितला नाही, तर अज्ञानी माणसाला तो समजणार नाही.
पुढील श्लोकात भगवंत सांगतात की, ज्ञानी असलेला श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, त्याचेच अनुकरण इतर लोक करतात. तो पुरुष जे कांही प्रमाण मानतो, लोकदेखील त्याला अनुसरून वर्तन करतात.
जे जे आचरितो श्रेष्ठ ते ते चि दुसरे जन । तो मान्य करितो जे जे लोक चालवितात ते ।। 21 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, या जगात थोर लोक जे कर्म आचरतात, ते धर्माला धरूनच असल्याने सामान्य लोक त्यालाच धर्म असे म्हणतात आणि त्याचेच आचरण करतात.
क्रमश: