Kolhapur News : अंबपमध्ये कृषीदूतांचे ग्रामपंचायतीमार्फत स्वागत
आधुनिक शेतीसाठी अंबपमध्ये कृषीदूतांची नियुक्ती
अंबप : अंबप (ता. ३) येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील कृषीदूतांचे ग्रामपंचायतीमार्फत स्वागत करण्यात आले. ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हे कृषीदूत सहा महिन्यांसाठी अंबप परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी विषयक माहिती देणार असून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.
या उपक्रमाअंतर्गत राहुल मगदूम, अरिंजय टाकळे, सुशांत माळी, शिवतेज क्षिरसागर व निलेश गंगधर हे विद्यार्थी कृषीदूत म्हणून कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, मृदापरीक्षण, कीड-रोग नियंत्रण, खत व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी यांत्रिकीकरण तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार, प्रा. आर. आर. पाटील, डॉ. एस. एम. घोलपे व प्रा. एन. एस. मेकळके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत हे कार्य करीत आहेत. ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या स्वागत समारंभात सरपंच दीप्ती विकासराव माने, उपसरपंच आशिफ मुल्ला, विश्वनाथ पाटील, पंकज अंबपकर व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायतीकडून कृषीदूतांचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे अंबप परिसरातील शेती अधिक शाश्वत व आधुनिक होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.