पिंगुळीची वैष्णवी धुरी बनली संगीत अलंकार
कुडाळ -
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी - धुरीटेंबनगर येथील युवा गायिका वैष्णवी अनिल धुरी हिने संगीत क्षेत्रातील संगीत अलंकार पदवी प्राप्त केली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्यावतीने शारदा संगीत विद्यालय (बांद्रा - मुंबई ) येथे घेण्यात आलेल्या संगीत अलंकार या पदवीधर परीक्षेमध्ये वैष्णवी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली.अतिशय खडतर असा संगीत क्षेत्रातील प्रवास तिने यशस्वीपणे पार केला. तिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन होत आहे. वैष्णवी गुरुवर्य अजित गोसावी यांच्याकडे संगीताचे धडे घेत आहे.या अलंकार परीक्षेत श्री गोसावी यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तसेच ज्येष्ठ शीष्य बंधू रत्नदीप सावंत, राजेश गुरव यांचे प्रोत्साहन त्याचप्रमाणे संगीत अलंकार श्रीराम दीक्षित (शिरोडा), संगीत अलंकार विणा दळवी व तबला विशारद आबा मेस्त्री (तेंडोली) यांचेही सहकार्य लाभले. या आतापर्यंतच्या तिच्या यशात तिच्या आई - वडिलांचे प्रोत्साहन व साथ आहे.तिला लहानपणापासूनच संगीताची आवड व संगीत गायनाची जाण असल्याने भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी गुरूवर्य संगीत अलंकार अजित गोसावी यांच्याकडे संगीताचे धडे घ्यायला केली. सतत रियाज व प्रचंड मेहनत करून तिने अवघ्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षी विशारद ही संगीत क्षेत्रातील पहिली पदवी मिळविली. याबरोबरच तिने भावगीत ,नाट्यगीत अभंग अशा विविध गायन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पारीतोषिके मिळविली आहेत. वृंदावन संगीत साधना ग्रुप ( पिंगुळी) च्यावतीने अभंग, भक्तिगीत, भावगीत,नाट्यगीत व शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम करीत आहे. स्वतः हार्मोनियम व तानपुरा वादनात पारंगत आहे. संगीत कार्यक्रमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आपल्या वादनातून आणि मधुर वाणीतील गायनाने रसिकांकडून वाहवा मिळविली आहे. सन 2024 - 25 डिसेंबर - जानेवारी मध्ये घेण्यात आलेल्या संगीत अलंकार पदवीधर परीक्षेत ती अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे अतिशय कठीण अशी परीक्षा तिने वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी मिळविली. सध्या ती संगीत व गायनाचे पुढील शिक्षण मुबई येथे घेत आहे.भावी पिढीला शास्त्रीय संगीत शिकता यावे.म्हणून वैष्णवीने पिंगुळी - धुरीटेंबनगर येथील स्वतःच्या घरी संगीत प्रशिक्षण वर्ग सुरू केला आहे. हे सर्व करीत असताना माणगाव येथील महाविद्यालयातून तिने बीए ची पदवी मिळविली. तिचे प्राथमिक शिक्षण पिंगुळी - धुरीटेंबनगर जिल्हा परीषद शाळेतून झाले,तर माध्यमिक शिक्षण लक्ष्मी नारायण विद्यालय (बिबवणे )येथे झाले. महाराष्ट्राची गायिका बनण्याचे तिचे पुढील स्वप्न आहे. तिची मेहनत जिद्द व परमेश्वराची साथ हे तिचे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल.