पोर्तुगीजांनी पाडलेली मंदिरे पुन्हा उभारा
गोमंतक मंदिर परिषदेत ठराव एकमुखाने संमत : वादग्रस्त मुद्दे आपसात सोडविण्याचा निर्णय
गोव्याने मंदिर, धार्मिक पर्यटनावर भर द्यावा
आज दुर्दैवाने गोव्याची प्रतिमा जगभर भोगभूमी म्हणून भासवली जात आहे. येथील कॅसिनो, सनबर्नसारख्या विविध पार्ट्या तसेच पर्यटनाच्या नावाखाली चाललेला स्वछंदी व्यवहार अशा चंगळवादी व विभत्स प्रकारामुळे गोव्यात संस्कृती आहे का? असा प्रश्न पडतो. म्हणून उत्तर प्रदेशमधील काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर गोवा सरकारनेही मंदिर संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार दृष्टीसमोर ठेऊन मंदिर पर्यटनावर भर द्यायला हवा, असे आग्रही मत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर तथा प्रखर हिंदुस्वनिष्ठ शेफाली वैद्य, हिंदू जनजागृती समितीचे धर्मप्रसारक नीलेश सिंगबाळ हे उपस्थित होते.
मठाधीशांच्या शुभेच्छा, आशीर्वाद
मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलीत कऊन परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर तपोभूमी कुंडईचे पिठाधीश सद्गुऊ ब्रह्मेशानंद स्वामीजींच्या संदेशाचे वाचन तपोभूमीचे वेदमूर्ती केदार यांनी केले. सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेचे युवराज गावकर यांनी केले. श्री गौडपादाचार्य मठाचे पीठाधीश प. पू. शिवानंद सरस्वती स्वामीजी यांचा शुभेच्छा संदेशही यावेळी वाचण्यात आला.
वाद आपसात सोडविणे शक्य
रमेश शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, गोव्यातील काही मंदिरात विश्वस्त, महाजन, पुरोहित, ग्रामस्थ यांच्यात अधिकाराबाबत न्यायालयीन खटले सुऊ आहेत. न्यायादानासाठी अक्षम्य विलंब लागतो. त्यामुळे मंदिरांचे अंतर्गत वाद आपापसामध्ये धार्मिक शास्त्रे आणि धर्माचार्य यांच्या माध्यमातून सोडविणे शक्य आहे. शेफाली वैद्य यांनी गोव्यातील मंदिरे ही मराठी शिक्षण, संस्कृती यांची केंद्रे असल्याचे नमूद केले. मंदिराच्या पायऱ्या चढताना मनातील अहं गळून पडतो. मंदिरे ही शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक केंद्रे आहेत. ती प्रत्यक्षात एक सांस्कृतिक चळवळ आहे, जी अव्याहतपणे संवर्धीत झाली पाहिजे. उद्घाटन सत्रानंतर विविध विषयांवर उद्बोधन सत्रे आणि परिसंवाद झाले. परिषदेला अंदाजे दोनशे पन्नास मंदिरांचे विश्वस्त, समिती सदस्य व भक्तगण उपस्थित होते. जयेश थळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुमेधा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. तर राहूल वझे यांनी आभार मानले.