आत्मज्ञान मिळाल्यावर पुनर्जन्म होत नाही
अध्याय नववा
आत्मज्ञान हे सर्व विद्यांचा राजा आहे. ते अत्यंत गोपनीय, परम-पवित्र, परम-श्रेष्ठ आहे. ते धर्मानुसार असल्याने सुखदायी आहे. ह्या अर्थाचा
राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ।। 2 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार आत्मज्ञानाबद्दल बोलताना भगवंत म्हणाले, माणसात हे ज्ञान असतेच पण ज्याप्रमाणे ढगांमुळे चंद्र झाकला जातो त्याप्रमाणे आत्म्याशी संबंधीत नसलेल्या सांसारिक मोहात माणसाचे मन गुंतल्याने ते झाकोळून गेलेले असते. ह्या ज्ञानाचा प्रकाश माणसाच्या अंतरंगात पडला की, इतर निरर्थक अनात्मगोष्टी माणसाच्या मनातून हद्दपार होतात. त्यामुळे हे शुद्ध ज्ञान माणसाला मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर बसवते.
हे ज्ञान सर्व विद्याचा राजा आहे म्हणून त्याला राजविद्या असं श्लोकात म्हटलं आहे. ते सहज आचरण करता येणारे आणि कायम टिकणारे आहे. ह्याचा दर्जा सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ आहे. हे ज्ञान सर्व गुप्त गोष्टींचा स्वामी म्हणून राजगुह्या आहे. हे पवित्र गोष्टींचा राजा आहे. हे ज्ञान ज्याला मिळाले आहे तो धर्मतत्वांचा आदर करतो. हे सर्व उत्तम पदार्थात उत्तम आहे. ते मिळाल्यावर पुनर्जन्म होत नाही. गुरुमुखातून ते ज्ञान अगदी थोड्या प्रमाणात उगवतांना दिसते, कारण ते प्रत्येकाच्या हृदयातच नित्यसिद्ध असते. त्यामुळे त्यावरील अज्ञानाचे कवच दूर झाले की, त्याची अनुभूती आपोआप येऊ लागते. हे ज्ञान मिळवण्यासाठी अनेक जन्मांचा दीर्घ कालावधी खर्ची पडतो. ज्याला ह्या ज्ञानाची ओढ लागलेली असते त्याच्या दृष्टीने तो मोठा कालावधी सुखदायक असल्याने त्याला त्याचा दीर्घपणा जाणवत नाही. तसेच संसाराच्या तुलनेत त्यात कमी परिश्रम करायचे असल्याने तो कधी थकत नाही की, कंटाळत नाही. एकदा आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की, सर्व भोग संपुष्टात येतात आणि मन आत्मसुखाने भरून जाते. प्रापंचिक गोष्टीतून सुख मिळते अशी माणसाची कल्पना असल्याने ते मिळवण्यासाठी मनुष्य शारीरिक कष्ट उपसत असतो. स्वरूप ज्ञान मात्र शारीरिक कष्टवाचून हृदयातच मिळत असल्याने ते मिळवण्यास सोपे असून श्रेष्ठ आहे. अर्जुना, याचे आणखीही एक महात्म्य म्हणजे हे प्राप्त झाले असता कधी हातातून जात नाही आणि अनुभवले असता कधी कमी होत नाही. शिवाय त्यात काही विकारही उत्पन्न होत नाहीत.
ह्यावर तुला अशी शंका येईल की, इतक्या महत्त्वाच्या ज्ञानाचा अनुभव घेतल्याशिवाय लोक कसे राहतील? शंभराला एक व्याज मिळून एकशे एक रुपये व्हावेत म्हणून जळत्या अग्नीमध्ये उडी घालायला तयार असलेले लोक कष्टावाचून मिळणाऱ्या स्वरूपसुखाची गोडी कशी टाकतील? त्यातून ते पवित्र व रम्य असून सुखोपायानेच प्राप्त होणारे, धर्माला धरून असणारे, आपल्याच ठिकाणी मिळणारे असे आहे तर सर्व प्रकारे सुखकर असलेले हे आत्मज्ञान लोकांच्या तडाख्यातून सुटले कसे? अशी शंका तुझ्या मनात आली तर ती रास्तच आहे पण ह्या ज्ञानापेक्षा त्यांना कल्पनेनुसार विषयातून जे सुख मिळते ते जास्त आकर्षक वाटते म्हणून ते आत्मज्ञानाच्या वाटेला जात नाहीत.
क्रमश: