कांगोतील गोमा शहरावर बंडखोरांचा कब्जा
सरकारने फेटाळला दावा : हजारो लोकांची शहराबाहेर धाव
वृत्तसंस्था. गोमा
आफ्रिकन देश डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोतील सर्वात मोठे शहर गोमावर बंडखोरांची संघटना एम23 च्या सदस्यांनी कब्जा केल्याचा दावा करण्यात आला आहे. या शहरात सैन्य आणि बंडखोरांदरम्यान संघर्ष सुरू होता. या बंडखोरांना शेजारील देश रवांडाचे समर्थन प्राप्त आहे. या संघर्षामुळे हजारो लोकांनी शहरातून स्थलांतर केले आहे. सुमारे 20 लाख लोकसंख्या असलेल्या गोमा शहरात बंडखोर शिरल्याने आणि गोळीबार सुरु झाल्याने खळबळ उडाली होती. तर दुसरीकडे अनेक लोक रस्त्यांवर उभे राहून बंडखोरांचे स्वागतही करत होते. याचबरोबर हजारो लोकांनी स्वत:च्या कुटुंबीय अन् अन्य सामग्रीसह रवांडाच्या सीमेत प्रवेश केला आहे. कांगो सरकारने शहरात बंडखोर दाखल झाल्याचे मान्य केले, परंतु शहरावर कब्जा झाला नसल्याचा दावा केला आहे.
2012 मध्येही केला होता कब्जा
बंडखोर गट एम23 कांगोमध्ये सक्रीय 100 हून अधिक बंडखोर गटांपैकी एक आहे. या बंडखोरांनी 2012 मध्ये अस्थायी स्वरुपात गोमा शहरावर कब्जा केला होता. परंतु आंतरराष्ट्रीय दबावामुळे या बंडखोरांना शहरातून काढता पाय घ्यावा लागला होता. पण 2012 च्या अखेरीस या गटाने शहरात पुन्हा हात-पाय पसरविण्यास सुरुवात केली होती. कांगो सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघाने रवांडावर बंडखोरांना समर्थन दिल्याचा आरोप केला आहे. तर रवांडाने हा आरोप नाकारला आहे.
रवांडा सरकारचे प्रत्युत्तर
कांगो सरकार एम23 सोबत चर्चा करण्यास अपयशी ठरले आहे. या अपयशामुळे हा संघर्ष लांबला आहे, या संघर्षामुळे आमची सुरक्षा अन् सार्वभौमत्वासाठी गंभीर धोका निर्माण झाला असलयचे रवांडाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
बंडखोरांकडून 48 तासांची मुदत
बंडखोरांनी शनिवारी कांगो सैन्याला 48 तासांमध्ये शस्त्रास्त्रs खाली ठेवण्याचा इशारा दिला होता. तर यानंतर सोमवारी बंडखोरांनी शहरावर कब्जा केल्याचा दावा केला. कांगोच्या सैनिकांना शहरातील स्टेडियममध्ये येण्याची सूचना बंडखोरांनी केली आहे.