पराभवानंतर ‘तृणमूल’मध्ये बंडाळी ?
वृत्तसंस्था/ कोलकाता
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता तृणमूल काँग्रेसमध्ये बंडाळी माजण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. पक्ष भ्रष्टाचाऱ्यांच्या हाती गेल्याने पक्षावर पराभवाची नामुष्की ओढविल्याची टीका पक्षाचे माजी राज्यसभा सदस्य आणि माजी आयएएस अधिकारी जवाहर सरकार यांनी केली आहे. पक्षाचा हा मोठा पराभव केवळ बाह्या कारणांमुळे नव्हे, तर पक्षांतर्गत कारणांमुळे झाला आहे, असे प्रतिपादन त्यांनी बुधवारी कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पक्षाची स्थिती स्पष्ट केली. गेल्या सप्टेंबरमध्ये सरकार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा त्याग केला होता. आर. जी. कर महाविद्यालयात घडलेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले होते. मात्र, त्यांनी पक्षत्याग केलेला नव्हता. आजही ते या पक्षात कार्यरत आहेत. ज्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी कार्य केले, त्यांना आज पक्षात कस्पटासमान वागणूक दिली जाते. मात्र, ज्यांनी काहीही केले नाही आणि केवळ कोणाची तरी खुषमस्करी केली त्यांना मानाची पदे देण्यात आली आहेत, असाही गंभीर आरोप त्यांनी केला. असेच होत राहिले, तर पक्षाला भवितव्य उरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पक्ष कोण सावरणार, असा प्रश्नही त्यांनी केला.
ममता बॅनर्जी कारणीभूत
भारतीय जनता पक्षाने राज्यात प्रयत्न करुन स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. मात्र, पक्षाला हे स्थान मिळवून देण्यामध्ये प्रत्यक्ष मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची वादग्रस्त कार्यपद्धतीही कारणीभूत ठरली आहे. 2011 मध्ये राज्यात सत्तेवर आल्यानंतर त्यांनी इतर विरोधी पक्षांना दुर्बल करण्याचा प्रयत्न केला. त्याआधी त्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती केली होती. तेव्हापासून या पक्षाला राज्यात स्थान मिळाले. आता या पक्षाने राज्यभर विस्तार केला, असे प्रतिपादन त्यांनी केले.
तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना नाही स्थान
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसचे अनेक वादग्रस्त कार्यकर्ते आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, अशा घोषणा करीत आहेत. मात्र, तृणमूल काँग्रेसमधील कोणत्याही वादग्रस्त कार्यकर्त्याला किंवा नेत्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. केवळ पक्ष नेतृत्व ज्यांना पक्षात प्रवेश देईल त्यांनाच घेतले जाईल. स्वयंघोषित प्रवेशकर्त्यांशी भारतीय जनता पक्षाचा कोणताही संबंध नाही, अशी महत्वपूर्ण घोषणा भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल राज्यशाखेचे प्रवक्ते देबजीत सरकार यांनी केली आहे. विशेषत: तृणमूल काँग्रेसमधील ज्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर हिंसाचार, खंडणीवसुली, हत्या, अत्याचार आणि तत्सम गंभीर आरोप आहेत, त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे आपल्यावर कायदेशीर कारवाई होणार नाही, अशा समजुतीत त्यांनी राहू नये. पूर्वीच्या सरकारच्या काळात जे गुन्हे घडले, त्यांची चौकशी केली जाईल आणि संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असा कठोर इशाराही सरकार यांनी दिला आहे.