For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ममता बॅनर्जी यांच्या घरातच ‘बंड’

06:03 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
ममता बॅनर्जी यांच्या घरातच ‘बंड’
Advertisement

तिकिटवाटपावर भावानेच व्यक्त केली नाराजी : भाजपच्या वाटेवर

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे कनिष्ठ बंधू बाबुन बॅनर्जी यांनी बुधवारी पक्षाच्या एका निर्णयाला विरोध दर्शविला आहे. पश्चिम बंगालच्या हावडा लोकसभा मतदारसंघात प्रसून बॅनर्जी यांना पुन्हा उमेदवारी देण्याच्या निर्णयावर बाबुन बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसमधील अभिषेक बॅनर्जी यांचे वाढलेले प्रस्थ पाहता बाबुन हे मागील काही काळापासून नाराज असल्याचे मानले जात होते. यातूनच बाबुन हे वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

Advertisement

बाबुन बॅनर्जी हे सध्या नवी दिल्लीत असून ते ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. बाबुन यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचा दावा केला आहे, परंतु हावडा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार करत असल्याचे बाबुन यांनी म्हटले आहे. बाबुन यांनी एकप्रकारे ममता बॅनर्जी यांनाच आव्हान दिल्याचे मानले जात आहे. बाबुन यांच्या या भूमिकेमुळे ममता बॅनर्जी यांच्या घरातच दोन गट पडल्याची चर्चा आहे.

हावडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीबद्दल मी समाधानी नाही. प्रसून बॅनर्जी हे योग्य पर्याय नाहीत. अनेक सक्षम उमेदवारांकडे पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केले आहे. प्रसून यांनी केलेला अपमान मी कदापिही विसरू शकणार नसल्याचे म्हणत बाबुन यांनी नव्या राजकीय संघर्षाचे संकेत दिले आहे. हावडा मतदारसंघातील मी नोंदणीकृत मतदार असल्याचेही बाबुन यांनी नमूद केले आहे. प्रसून बॅनर्जी हे माजी फुटबॉलपटू असून हावडा मतदारसंघात दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

अपक्ष उमेदवारी शक्य

ममता बॅनर्जी (दीदी) माझ्या निर्णयाशी सहमत नसणार हे मी जाणून आहे. परंतु गरज भासल्यास मी हावडा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहे. जोपर्यंत ममतादीती आहेत, तोपर्यंत मी तृणमूल काँग्रेस सोडणार नाही तसेच अन्य कुठल्याही राजकीय पक्षात सामील होणर नाही. मी क्रीडाक्षेत्राशी संबंधित असल्याने अनेक भाजप नेत्यांना वैयक्तिक स्तरावर ओळखतो असे बाबुन यांनी म्हटले आहे.

ममतांकडून प्रत्युत्तर

बाबुन बॅनर्जी यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी स्वत:च्या कनिष्ठ बंधूपासून अंग झटकले आहे. निवडणुकीपूर्वी बाबुन हे समस्या निर्माण करत असतात. मला हपापलेले लोक पसंत नाहीत. मी घराणेशाहीच्या राजकारणात विश्वास ठेवत नाही. यामुळे बाबुन यांना उमेदवारी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाबुन यांच्यासोबतचे सर्व नाते मी तोडत असल्याचे ममता बॅनर्जी जलपाईगुडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. बाबुन यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा. पक्ष स्वत:चा अधिकृत उमेदवार प्रसून बॅनर्जी यांच्यासोबत उभा असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Advertisement
Tags :

.