तेलंगणा काँग्रेसमध्ये बंडाळीचे पडघम
10 आमदारांनी घेतली गुप्त बैठक, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी बोलावली आपत्कालीन बैठक
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरू झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. काँग्रेसच्या 10 आमदारांनी बंद दाराआड बैठक घेतल्यानंतर बंडखोरीचे पडघम वाजू लागले आहेत. असंतुष्ट आमदार राज्यातील प्रभावी मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते. बंडाळीची कुणकुण लागताच मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सर्व मंत्र्यांसोबत पक्षाच्या आमदारांमधील वाढत्या असंतोषाला शांत करण्यासाठी कमांड कंट्रोल सेंटरमध्ये बैठक आमंत्रित केल्याचे समजते.
राज्यातील काही आमदार पक्ष नेतृत्त्वावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आमदारांचा एक गट गुप्तपणे वावरत असल्याचे गेल्या काही दिवसांमधील राजकीय हालचालींवरून दिसून येत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि एमएलसी निवडणुकीपूर्वी आमदारांनी केलेल्या कोणत्याही बंडामुळे जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भीती काँग्रेस हायकमांडला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली असून त्याला असंतुष्ट आमदार उपस्थित राहतात की नाही यावर पुढील दिशा ठरणार आहे. असंतुष्टांच्या निशाण्यावर असलेले मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रे•ाr यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आपला पालैरचा दौरा रद्द केला आहे. मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांनी अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित न राहण्याचे निर्देश दिल्यामुळे पक्षातील मतभेदाचे गांभीर्य दिसून येते.
गुप्त बैठकीमध्ये खलबते
आमदार अनिरुद्ध रेड्डी यांच्या फार्महाऊसवर दहा काँग्रेस आमदारांची भेट झाल्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या अटकळाला बळकटी मिळाली. बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांमध्ये नैनी राजेंद्र रेड्डी, भूपती रेड्डी, येनम श्रीनिवास रेड्डी मुरली नाईक, कुचुकुल्ला राजेश रेड्डी संजीव रेड्डी अनिरुद्ध रेड्डी, लक्ष्मीकांत, दोंथी माधव रेड्डी आणि बिर्ला इलैया यांचा समावेश होता. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व आमदारांकडून तेलंगणा काँग्रेस स्पष्टीकरण मागणार असल्याचे समजते.
खासदारांनी बंडखोरीची शक्यता फेटाळली
काही काँग्रेस आमदारांच्या गुप्त बैठकीनंतर निर्माण झालेला वाद लपवण्याचा प्रयत्न करताना नगरकुरनूलचे खासदार मल्लू रवी यांनी ‘ही फक्त एक डिनर बैठक होती’ असे स्पष्ट केले. तसेच या बैठकीला विनाकारण जास्त महत्त्व दिले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना काँग्रेस खासदार मल्लू यांनी याबाबत भाष्य केले. आमदारांची बैठक कोणत्याही फार्महाऊसवर नाही तर आयटीसी कोहिनूर येथे झाली. येथे 10 आमदार रात्रीच्या जेवणाला उपस्थित राहणार होते, परंतु फक्त आठ आमदार उपस्थित राहिले. यातील काही आमदारांशी आपला संपर्क झाला असून बंडखोरीची कोणतीही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे.