जुनी विज्ञान कल्पना साकार
जुन्या काळात मानवाने चित्रपटांमधून किंवा कथा-कादंबऱ्यांमधून अनेक कल्पना किंवा फँटसीजचा आधार घेत कल्पनाविश्व निर्माण केले आहे. भविष्यकाळात त्या खऱ्या ठरतील, असे त्याला त्यावेळी वाटलेही नसेल. पण अशा कित्येक फँटसीज अलिकडच्या काळात प्रत्यक्षात उतरल्या आहेत. स्वत:च्या आकारात परिवर्तन करणारे यंत्रमानव ही यांच्यापैकीच एक कल्पना असून जी आज खरी ठरली आहे.
स्वत:च्या आकारात कामाच्या आणि परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार परिवर्तन करणारे यंत्रमानव किंवा रोबोज निर्माण करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. असे आकार परिवर्तन करण्याची क्षमता केवळ पातळ पदार्थांमध्ये असते. पातळ पदार्थ त्यांच्या ज्या भांड्यात किंवा कंटेनरमध्ये ठेवले जाते, त्याप्रमाणे स्वत:च्या आकारात परिवर्तन करु शकतात. पण शास्त्रज्ञानी घनस्वरुपातील यंत्रमानवांनाही आपला आकार परिवर्तीत करण्याची क्षमता आता मिळवून दिली आहे. 1991 मध्ये टर्मिनेटर 2 ‘जजमेंट डे’ नामक एक चित्रपट आला होता. या चित्रपटात टी-1000 नामक एक यंत्रमानव दाखविला होता. या यंत्रमानवाला ही आकार परिवर्तन करण्याची क्षमता प्राप्त असल्याचे या चित्रपटात दाखविण्यात आले होते.
अशाच प्रकारचा यंत्रमानव आता प्रत्यक्षात साकारला आहे. या यंत्रमानवाचा उपयोग झाला की त्याच्या आकारात परिवर्तन करुन तो एखाद्या बाटलीत बंद करुन ठेवला जाऊ शकतो. तो कधी एखाद्या बशीचा किंवा कधी उभा आकार धारण करु शकतो, असे संशोधकांचे प्रतिपादन आहे. हे यंत्रमानव लोकचुंबक, मोटर्स आणि प्रकाश यांच्या साहाय्याने स्वत:चे रुपांतर कठीण यंत्रमानवातून द्रवरुप यंत्रमानवात करु शकतील. यामुळे अत्यंत अरुंद किंवा सोयीच्या नसलेल्या जागेमध्येही त्यांना पोहचविणे शक्य होणार आहे. हे संशोधन अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात झाले आहे. या आकार परिवर्तन करु शकणाऱ्या यंत्रमानवांकडून अनेक अवघड कामे लीलया करुन घेतली जाऊ शकतात. असे यंत्रमानव निर्माण करण्याची कल्पना या संशोधकांना नैसर्गिक मानव, तसेच अन्य सजीव यांच्याकडूनच मिळाली आहे. अनेक सजीवांमध्ये त्यांच्या पेशींचे एकत्रीकरण करुन स्वत:च्या आकारात परिवर्तन करण्याची क्षमता असते. अशीच क्षमता या यंत्रमानवांमध्ये आहे. त्यामुळे एकाच यंत्रमानवाचा उपयोग विविध परिस्थितींमध्ये, विविध स्थानांमध्ये आणि विविध प्रकारची कामे करुन घेण्यासाठी करता येऊ शकेल. हे संशोधन अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. कालांतराने हे तंत्रज्ञान अधिक विकसीत झाल्यानंतर त्याचा व्यापारी उपयोग करता येऊ शकेल, असे दिसते.