रियल माद्रीदचा विजय
वृत्तसंस्था / माद्रीद
स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेतील येथे रविवारी झालेल्या सामन्यात रियल माद्रीदने अल्व्हेसचा 1-0 अशा गोल फरकाने निसटता पराभव केला. या विजयामुळे आता रियल माद्रीदचा संघ आघाडीवर असलेल्या बार्सिलोनापेक्षा 4 गुणांनी पिछाडीवर आहे. रियल माद्रीदच्या सामन्यात पूर्वाधार्थ दांडगाईचा खेळ केल्याबद्दल फ्रान्सचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू कायलेन एम्बापेला पंचांनी लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले.
या सामन्यात एम्बापेला पंचांनी दांडगाईचा खेळ केल्याबद्दल लाल कार्ड दाखवित त्याला मैदानाबाहेर काढले. आता या कारवाईमुळे एम्बापेवर किती सामन्यांची बंदी घातली जाईल हे सध्या समजू शकलेले नाही. या सामन्यामध्ये पहिल्या 10 मिनिटातच एम्बापेकडून अल्व्हेसच्या खेळाडूंकडील चेंडू मिळविण्यासाठी जोरदार धक्का देण्यात आला. पंचांनी यावेळी त्याला ताकीद देत पिवळे कार्ड दाखविले होते. दरम्यान एम्बापेकडून पुन्हा आगळीक झाल्याने त्याच्यावर पंचांनी लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. 2019 नंतर एम्बापेला कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचांकडून लाल कार्ड दाखविले गेले नव्हते. एम्बापेवर एका सामन्याची बंदी घातली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या सामन्यातील शेवटच्या 20 मिनिटांमध्ये अल्व्हेस संघालाही 10 खेळाडूनिशी खेळावे लागले. अल्व्हेस संघातील मनु सांचेझला पंचांनी मैदानाबाहेर काढले होते. रियल माद्रीदचा एकमेव गोल एदुआद्रो कॅमेव्हींग्जने केला. गेल्या शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात बार्सिलोनाने लिगेन्सचा 1-0 असा पराभव केल्याने या संघाने माद्रीदवर 4 गुणांची आघाडी मिळविली आहे.