रियल माद्रीद, अर्सेनेल विजयी
वृत्तसंस्था / माद्रीद
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात ब्रेहीम डायझच्या शानदार कामगिरीच्या जोरावर रियल माद्रीद संघाने अॅटलेटिकोचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करुन शेवटच्या 16 संघात स्थान मिळविले.
आतापर्यंत 15 वेळा विक्रमी युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या रियल माद्रीद संघाने या सामन्यात दर्जेदार खेळ केला. आतापर्यंत युफाच्या विविध स्पर्धांमध्ये या दोन संघांमध्ये 11 वेळा गाठ पडली असून त्यापैकी केवळ तीन सामने अॅटलेटिकोने जिंकले आहेत. या सामन्यात रॉड्रीगोने रियल माद्रीदचे खाते उघडले. त्यानंतर 32 व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने अॅटलेटिकोला बरोबरी साधून दिली. डायजने रियल माद्रीदचा दुसरा आणि निर्णायक गोल करुन अॅटलेटिकोचे आव्हान संपुष्टात आणले.
मंगळवारी झालेल्या या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात अर्सेनेलने पीएसव्हीचा 7-1 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील बाद फेरी टप्प्यातील अर्सेनेलचा हा सर्वात मोठा विजय आहे. तब्बल 6 वर्षानंतर अर्सेनेल संघाचे गेल्यावर्षीच्या हंगामात पुनरागमन झाले होते. मंगळवारच्या सामन्यात पहिल्या 30 मिनिटांच्या कालावधीत अर्सेनेलने 3-0 अशी आघाडी घेतली होती. या संघातील 17 वर्षीय फुटबॉलपटू नेवानेरीने 21 व्या मिनिटाला अर्सेनेलचा दुसरा गोल केला. तत्पूर्वी ज्युरियन टीमबेरने पाचव्या मिनिटाला अर्सेनेलचे खाते उघडले होते. 30 व्या मिनिटाला अर्सेनेलचा तिसरा गोल मेरीनोने केला. अर्सेनेलचा कर्णधार मार्टिन ओडेगार्डने या सामन्यात दोन गोल नोंदविले तर ट्रोसेर्ड आणि रिकाद्रो कॅलेफ्लोरीने प्रत्येकी 1 गोल केला. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात बोरुसिया डॉर्टमनला लिलीने 1-1 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात हेरार्ल्डसनने लिलीतर्फे तर करिम अॅडेमीने डॉर्टमंडतर्फे गोल नोंदविले.