रिअल माद्रिदची साल्झबर्गवर 3-0 विजय मिळवून आगेकूच
वृत्तसंस्था/ फिलाडेल्फिया
व्हिनिसियस ज्युनियरने केलेला एक गोल आणि अन्य एका गोलासाठी केलेली मदत यांच्या जोरावर रिअल माद्रिदने साल्झबर्गवर 3-0 असा विजय मिळवला, यामुळे क्लब विश्वचषकाच्या गट ‘एच’मध्ये स्पॅनिश पॉवरहाऊसने प्रथम स्थान मिळवले आहे तसेच 16 संघांच्या फेरीतही स्थान मिळवले आहे.
व्हिनिसियसने 40 व्या मिनिटाला पेनल्टी बॉक्सच्या बाहेरून डाव्या पायाने फटका हाणत गोल करून लिंकन फायनान्शियल फील्डवरील 64,811 इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आणि भिजलेल्या चाहत्यांना आनंदोत्सव साजरा करण्यासाठी निमित्त दिले. ज्यूड बेलिंगहॅमने पावसामुळे निर्माण झालेल्या ओल्या मैदानाच्या परिस्थितीचा फायदा घेत दिलेल्या पासने व्हिनिसियसला गोल करण्यासाठी स्थितीत आणून ठेवले.
आठ मिनिटांनंतर मामाडी डायम्बोच्या खेळाडूला आदळून गेलेल्या पासमुळे व्हिनिसियससमोर साल्झबर्गच्या पेनल्टी बॉक्समध्ये जोआन गाडो तेवढा राहिला होता. पण फटका हाणण्यासाठी सुयोग्य अँगल नसल्याने व्हिनिसियसने फेडेरिको व्हॅल्व्हर्डेला बॅकहील पास दिला आणि उऊग्वेच्या खेळाडूला 10 यार्ड अंतरावरून गोल करण्याची संधी मिळाली. 60 व्या मिनिटाला आंतोनियो ऊडिगरला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. तो तरीही खेळत राहिला, परंतु सहा मिनिटांनंतर त्याला बाहेर काढण्यात आले. रिअल माद्रिदच्या आगामी सामन्यासाठी तो उपलब्ध होऊ शकेल की नाही ते पाहावे लागेल. अनेक खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे आणि राउल असेन्सियोला निलंबित केल्यामुळे त्यांची सेंटर बॅक पोझिशन कमकुवत झाली आहे.
मिडफिल्डमध्ये गाडोकडून चेंडू ताब्यात घेऊन प्रतिआक्रमण केल्यानंतर गोंझालो गार्सियाने 84 व्या मिनिटाला चिप शॉट हाणून रिअलचा तिसरा गोल केला. या विजयासह रिअल माद्रिद 16 संघांच्या फेरीत पोहोचणारा नववा युरोपियन संघ ठरला आहे. स्पर्धेतील 12 युरोपियन संघांपैकी फक्त अॅटलेटिको माद्रिद, पोर्तो आणि साल्झबर्ग गट टप्प्यात बाहेर पडले आहेत. रिअल माद्रिद सात गुणांसह गट ‘एच’मध्ये अव्वल स्थानावर राहिला आहे. मंगळवारी फ्लोरिडातील मियामी गार्डन्स येथील हार्ड रॉक स्टेडियमवर माद्रिदचा सामना मँचेस्टर सिटीकडून 5-2 अशा फरकाने पराभूत झालेल्या युवेंटसशी होईल.