रिअल इस्टेट उद्योजक खून प्रकरणाचा उलगडा
विजापूर जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांची माहिती : सहा आरोपींना अटक
वार्ताहर/विजापूर
शहराजवळील अलियाबाद औद्योगिक परिसरात घडलेल्या भीषण खून प्रकरणाचा विजापूर ग्रामीण पोलिसांनी अतिशय कमी कालावधीत उलगडा करून 6 आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, 14 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता गोडंदोड्डी येथील रहिवासी व रिअल इस्टेट उद्योजक राजू बापू खरे (वय 42) हे त्यांच्या थार कारने विजापूरकडे येत असताना, अलियाबाद औद्योगिक क्षेत्रातील धरिदेवर पेठेजवळ टिप्पर वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. त्याचवेळी दोन दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी कार अडवून दगडांनी हल्ला केला आणि नंतर पिस्तूलातून गोळी झाडून कारमध्येच राजू खरे यांची हत्या केली. पोलिसांनी अबुश्या सोपान कोडलेकर (वय 36), अबाश्या बाळू माने (वय 35), वागीश शंकर पोल (वय 31), जालिंदर उर्फ पोपट हक्के (वय 29), खंडूबा उर्फ अजित तांबे (वय 29) आणि मरगू उर्फ मरगू हक्के (वय 24) यांना अटक केली आहे. आरोपींनी खून करण्यासाठी पूर्वनियोजित कट रचून टिप्पर वाहनाने कारला धडक देऊन त्यानंतर गोळीबार करून हत्या केल्याचे उघड झाले.