रियल अॅक्वा मॅन
13 मिनिटांपर्यत पाण्यात राहू शकतात लोक
अॅक्वा मॅन डीसी कॉमिक्सचा सुपरहिरो असून तो समुद्रात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी आरामात राहू शकतो. या पात्रावरून हॉलिवूडमध्ये याच नावाने चित्रपटही निर्माण झाला आहे. यात अॅक्वा मॅन ऑक्सिजन सिलिंडरशिवाय खोल समुद्रात हिंडत असल्याचे दाखविण्यात आले आहे. आता खऱ्याखुऱ्या आयुष्यातील असाच ‘अॅक्वा मॅन’ देखील पाण्याच्या आत सहजपणे बराच वेळ राहू शकतो. याचे पूर्ण जीवन समुद्रावर निर्भर आहे.
शतकांपासून फिलिपाईन्स, मलेशिया आणि इंडोनेशियाच्या किनाऱ्यांदरम्यान एक समुदाय पाण्यावर हाउसबोट्स तयार करून राहत आहे. हे याच भागात समुद्रात फिरत असतात. हे लोक 13-13 मिनिटांपर्यंत पाण्यात राहू शकतात आणि शिकार करू शकतात. ते कुठल्याही देश किंवा बेटाच्या स्थलीय सीमेला बांधील नाहीत. त्यांचे पूर्ण अस्तित्व भरती-ओहोटीच्या अवतीभवती केंद्रीत आहे. या विशेष समुदायाला बाजाऊ म्हटले जाते.
पाण्यात सहजपणे राहतात बाजाऊ लोक
या बाजाऊ लोकांकडे एक अद्भूत क्षमता असते, जी त्यांना इतरांपासून वेगळी करते. तसेही त्यांची पूर्ण जीवनशैलीच जमिनीवर राहणाऱ्या सामान्य लोकांपेक्षा वेगळी आहे. परंतु ते स्वत:च्या फ्रीडायव्हिंगच्या अद्भूत क्षमतेसाठी ओळखले जातात. ते 200 फूट खोलवर 10-13 मिनिटांपर्यंत पाण्यात राहू शकतात.
बालपणापासून गिरवितात धडे
कमी वयापासूनच बाजाऊ समुदायाची मुले सागरी अर्चिनच्या शोधात खोल पाण्यात जात असतात. दीर्घकाळापासून खोल समुद्रात बराच वेळ राहिल्यावर त्यांनी स्वत:च्या फुफ्फुसांना पाण्यात राहण्यालायक अनुकूल केले आहे. बाजाऊमध्ये मोठी तिल्ली विकसित झाली आहे. याचमुळे ते 200 फूटाच्या खोलीवर 10 मिनिटांपर्यंत पाण्यात राहू शकतात.
समुद्रावर तरंगणारी घरं
फिलिपाईन्सच्या वंशाचे बाजाऊ अद्याप पिढ्यांपासून चालत आलेल्या सागरी शिकार तंत्रज्ञानांना संरक्षित करतात. ते पाण्यावर तरंगणाऱ्या हाउसबोटमध्येच राहतात. उपजीविकेसाठी या तंत्रज्ञानांवर निर्भर राहण्यासोबत ते बेटवासीयांसोबत अतिरिक्त माश्यांचा वापर करतात. याच्या बदल्यात आवश्यक वस्तूंचा साठा ते करतात.
कुठलाच देश नाही
बाजाऊ लोक शतकांपासून सुलु सागराच्या पाण्याला पार करत आले आहेत. हा जगातील एकमात्र आत्मनिर्भरसागरी भटका समुदाय आहे. बाजाऊसाठी कुठलाच देश नाही, हे केवळ समुद्रालाच स्वत:चे घर मानतात. केवळ 100-200 बाजाऊ परिवारच पारंपरिक लांसा हाउसबोटवर राहतात. ही हाउसबोट बोडगया बेटानजीक बोहे बुअल समुदायाचा हिस्सा आहे. ज्यात 10 चौरस मीटरची राहण्याची जागा असते आणि एका हाउसबोटमध्ये 9 लोक राहू शकतात.
समुद्राशी निगडित पूर्ण जीवन
15 व्या शतकाच्या प्रारंभापासूनच बाजाऊचे विविध समुह फिलिपाईन्स आणि मलेशियाच्या सबा क्षेत्रादरमयान राहण्यासाठी आले होते. यामुळे सांस्कृतिक आदान-प्रदान आणि वसाहती विकसित झाल्या. वसाहतकाळात बाजाऊसाठी जीवन आणखी जटिल झाले, जेव्हा मलेशिया, फिलिपाईन्स आणि इंडोनेशियाने सुलु क्षेत्रात सागरी सीमा निश्चित केल्या. या सीमा 1885 च्या माद्रिद प्रोटोकॉल अंतर्गत ठरल्या. यावेळी तेथे राहणाऱ्या समुदायांचे वितरण अन् वैविध्याचा विचार करण्यात आला नव्हता.
इमिग्रेशन कायद्यांमुळे समस्या
अचानकच बाजाऊ एका अनिश्चित कायदेशीर स्थितीत अडकले, जी 1970 च्या मिंडानाओ क्षेत्रात गृहयुद्धादरम्यान आणखी बिकट झाली. यामुळे अनेक बाजाऊ परिवारांना बोर्नियोच्या पूर्व किनाऱ्याच्या दिशेने पलायन करावे लागले. तेव्हापासून ते मलेशियाच्या नोकरशाही प्रक्रियांना तेंड देत आहेत.
जमिनीवर राहण्याचा विचार
पूर्व मलेशियन शहर सेम्पोर्नानजीक पारंपरिक लांसा हाउसबोटमध्ये अद्याप सुमारे 100-200 बाजाऊच राहत आहेत. बोर्नियो मुख्य भूमीवर वसण्यासाठी नागरिकत्व किंवा औपचारिक अधिकारांच्या अभावामुळे फिलिपाईन्स वंशाच्या बाजाऊ अद्याप पिढ्यांपासून चालत असलेल्या सागरी शिकार तंत्रज्ञानांना संरक्षित करतात. परंतु आता हे लोक मुख्य भूमीवर जाण्याचा विचार करत आहेत.