युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेशी चर्चेला तयार
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची स्पष्टोक्ती : विजयानंतर ट्रम्प यांचे कौतुक-अभिनंदन
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन करत कौतुक केले. तसेच पेनसिल्व्हेनिया येथे एका रॅलीत ट्रम्प यांच्यावर गोळीबार करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा संदर्भ देत पुतीन यांनी त्यांना धैर्यवान आणि धाडसी व्यक्ती असल्याचेही संबोधले. याचवेळी रशिया-युव्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांशी बोलण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुतीन यांनी रशियन शहरातील सोची येथे एका धोरण मंचादरम्यान अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालांवर आपली पहिली सार्वजनिक टिप्पणी केली. आपल्या दीर्घ भाषणाच्या शेवटी प्रश्नांची उत्तरे देताना पुतीन म्हणाले की, ‘अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ट्रम्प यांचे मी अभिनंदन करतो.’ तसेच ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहात का असे विचारले असता त्यांनी ‘आम्ही तयार आहोत.’ असे स्पष्ट उत्तर देऊन टाकले. अमेरिका-रशिया संबंध पुनर्संचयित करण्यासाठी आणि युव्रेनमधील युद्ध संपवण्याच्या दिशेने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
युव्रेनमधील युद्ध लवकर संपवण्याच्या वाटाघाटी करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावाचा परिणाम काय होईल, असे पुतीन म्हणाले. मात्र, अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचे प्रस्ताव अभ्यासण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. वॉशिंग्टनमधील राजकीय शक्तींनी ट्रम्प यांना त्यांच्या मागील कार्यकाळात मॉस्कोशी संबंध सुधारण्यापासून रोखले होते, असेही पुतीन पुढे म्हणाले.
‘ट्रम्प खूप धाडसी आहेत’
जुलैमध्ये ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी ज्याप्रकारे स्वत:ला हाताळले ते पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. ते खूप शूर आणि धाडसी आहेत. त्यांनी माणूस म्हणून योग्य गोष्ट केली, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले.