बदलाची तयारी गरजेची..
खरंतर भावनिक स्थिरता आणि परिपक्वता या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात.व्यक्ती स्वत:च्या भावनांची हाताळणी कशी करते,भावनांवर तिचं योग्य नियंत्रण आहे का? भावनेच्या आहारी जाऊन ती निर्णय घेते का? इतरांच्या भावनांची जाण आणि कदर तिला कितपत आहे? तिच्या भावनांची घुसमट किती होते आणि तिला मोकळेपणाने भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य,पोषक वातावरण आहे का?
त्यादिवशी बाजारामध्ये मॅडम,ओ
मॅडम अशी हाक कानावर आली. मला ओळखलतं? थोडा विचार करुन म्हटलं..हो..रीना ना?
हो मॅम!कसं चाललय तुझं? एकदम मस्त मॅडम!माझं सासरचं कुटुंब अगदी छान आहे. मीही आता नोकरी करते. रीना दहा मिनीटे बोलत राहिली खरी..पण तिचा आत्मविश्वास,सकारात्मक दृष्टिकोन मला समाधान देऊन गेला. चार वर्षांपूर्वी समोर आलेली रीनाची केस डोळ्यासमोरुन तरळून गेली.
खरंतर भावनिक स्थिरता आणि परिपक्वता या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात. व्यक्ती स्वत:च्या भावनांची हाताळणी कशी करते, भावनांवर तिचं योग्य नियंत्रण आहे का? भावनेच्या आहारी जाऊन ती निर्णय घेते का? इतरांच्या भावनांची जाण आणि कदर तिला कितपत आहे? तिच्या भावनांची घुसमट किती होते आणि तिला मोकळेपणाने भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य,पोषक वातावरण आहे का? अशा अनेक गोष्टींवर व्यक्तिमत्त्वाची जडणघडण तसं आयुष्यातील यशापयश अवलंबून असतं. पर्यायाने तिच्या मानसिक आरोग्याचा स्तरही ठरत असतो. आपल्या समाजात काही अपवाद वगळता स्त्रियांच्या भावनांची म्हणावी तशी कुटुंबात दखल न घेतली जाणं, ज्या भावनिक संघर्षाला तोंड देत काही स्त्रिया आयुष्य कंठत असतात त्या स्त्रियांना आई झाल्यावर आपल्या मुलांचा भाव विश्वसमृद्ध करताना अडथळे येऊ शकतात आणि मुलं देखील योग्य पद्धतीने भावना हाताळू शकत नाहीत.
रीना त्यावेळी भेटली तेव्हा तिची अशीच काहीशी विचित्र स्थिती होती. रीना एम.कॉम झालेली 26 वर्षांची सावळी, अॅक्टीव्ह मुलगी! तिला ग्रॅज्युएशनला असलेली बहीण होती. तिच्या आईवडिलांची दुसरा तरी मुलगा व्हावा ही इच्छा होती. पण मुलगीच झाली म्हणून आई-वडील नाराज! आई-वडिलांचे सूर तसे कधी जुळले नाहीत. धाकटी मुलगी अभ्यासात खूप हुशार,दिसायला सुस्वरुप असल्याने रीनापेक्षा झुकतं माप तिला दिलं जायचं.आईचा मुळातच अतिशय नकारात्मक दृष्टिकोन. नेहमी नवऱ्याचा राग मुलींवर आणि विशेषत: रीनावर काढायची सवय!
एम. कॉम झाल्या झाल्या रीनाला लगेच नोकरी लागली पाहिजे अशी आईची अपेक्षा! तुझ्याकडे पैसे कसे उभे होतील कुणास ठाऊक? असे दिवसातून एकदा तरी रीनाला ऐकायला लागायचं. वडील घरात असूनही असून नसून सारखेच! कशातच सहभाग नसायचा. अशा वातावरणात राहून रीनावर जगण्याचं दडपण आलं होतं. ती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा सुरुवातीला दहा मिनिटे बोलणं झाल्यानंतर रीनाला मी एक माहिती पत्र भरायला दिलं. त्यामध्ये तिच्याविषयीची माहिती भरायची होती. नाव लिहिल्यानंतर तारखेचा
कॉलम आला आणि ती अडखळली! काही केल्या तिला आजची तारीख आठवेना संपूर्णपणे ब्लँक झाली.क्षणभर तिने माझ्याकडे बघितलं आणि तिचा अश्रूंचा बांध फुटला. मीही तिला मनसोक्त रडू दिलं. पाच मिनिटांनी शांत झाल्यावर ती बोलायला लागली. मॅडम आजकाल मला तारीख, वार, सांगितलेलं महत्त्वाचं काम लक्षात न राहणे फार वाढले आहे. काही वेळेला गॅस बंद करायचं सुचत नाही.आईने एखादी वस्तू दुकानातून आणायला सांगितली तर तेही विसरते आणि आईची बोलणी खावी लागतात.आई तर काय वाटेल ते बोलत असते.कोणत्या जन्मीचा पाप म्हणून तू माझ्यापोटी जन्माला आलीस, माझे नशिब फुटके आहे.सुख म्हणून काही मिळेल या घरात तर शपथ! रीना तासभर बोलत होती आणि त्या तासाभरामध्ये सहा वेळा तरी रडली होती. पुढच्या सेशनच्या दरम्यानही अगदी क्षुल्लक गोष्टी सांगतानाही तिला रडू फुटायचं. तिचं भावनांवर अजिबात नियंत्रण नव्हतं. सावळा रंग म्हणून येणारा नकार,न मिळणारी नोकरी, आईच्या अपेक्षांचा ताण,सतत बहिणीशी होणारी तुलना आपण कशासाठी लायक नाही ही न्यूनगंडाची भावना असा सगळा गुंता सोडवायचा होता.
एकूण परिस्थितीचा तिला इतका ताण होता की आधी ताण कमी करण्यासाठी औषधांची गरज होती.त्या अनुषंगाने मनोविकारतज्ञांची भेट आवश्यक होती.ती झाल्यावर औषधे आणि समुपदेशन यांची सांगड घालत पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली.
रीनाने एक, दोन गोष्टींचा खुलासा आधीच करून टाकला ती म्हणाली माझी आई तुमच्याकडे येणं केवळ अशक्य आहे. तुम्ही तिच्याशी फोनवर पण बोलू नका.नाहीतर माझं येणं बंद होईल. मी तिला न सांगता तुमच्याकडे येते.मला स्वत:ला माझी समस्या हाताळता येत नाही म्हणून मी आयुष्य जगू शकेन का? असंच मला वाटतं .अशा अवघड परिस्थितीत केस हाताळणं आव्हानात्मक असते. केवळ एकच बाजू ऐकून उपचार सुरू केल्याने त्याची दिशा चुकण्याचाही संभव असतो.सरळ सरळ केस असेल तर फक्त समस्याग्रस्त व्यक्तीच्या सहकार्याने काम करता येतं.मी एक पर्यायी मार्ग स्वीकारला. रीनाची लहानपणापासूनची एक मैत्रीण तिच्या नेहमी घरी येत जात असे तिच्या मदतीने रीनाच्या स्वभावाबद्दल, आई-वडिलांबद्दल माहिती घेतली तेव्हा रीनाचं आणि आईचे अजिबात पटत नाही.आई तापट आहेच परंतु रीनाही खूप हुज्जत घालते त्यामुळे गोष्टी बिघडतात. तिचा स्वभाव संशयी आणि तर्कटी असून मैत्रीण म्हणूनही ती फार पझेसिव्ह असल्याचे कळले.तिच्या मैत्रिणीकडून इतकी माहिती कळल्यामुळे माझं काम जरा सोपं झालं मी तिला प्रश्न विचारला तुला यातून खरच बाहेर पडायचं का?
रीना- हो मॅडम, मग तुला स्वत:मध्ये काही बदल करावे लागतील. त्यासाठी पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या आई-वडिलांना जे जसे आहेत तसा स्वीकार करणे.कारण आपण ते बदलू शकत नाही. आई-वडिलांच्या सोबत बदल करण्यापेक्षा स्वत:मध्ये बदल करणे तुलनेने सोपं असतं.त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात योग्य असा बदल केलास तर त्याच व्यक्ती पूर्वी इतक्या त्रासदायक वाटत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे येता-जाता रडण्याची अजिबात गरज नसते, आपले अश्रू इतके स्वस्त झाले तर त्याचं महत्त्व उरत नाही. त्यादृष्टीने कुठल्याही गोष्टीचा अति संवेदनशीलतेने विचार करण्याची सवय स्वत:ला आणि समोरच्याला त्रासदायक ठरते हे लक्षात घ्यायला हवं. हळवेपणा,रडणं जर वाढत गेलं तर मानसिक संतुलन बिघडून ती व्यक्ती मनोविकारग्रस्त होऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे हे समजावून सांगितले. त्यादृष्टीने वास्तव लक्षात घेऊन प्रयत्नपूर्वक आपल्या भावनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी पुढे तिला विचार, भावना आणि कृती साखळी लक्षात आणून दिली. तसंच त्याविषयी चर्चा झाली.सजगता तंत्रातील साक्षीध्यान, बॉडिस्कॅन,करुणाध्यान ही तंत्रे शिकविली.
तशी बराच काळ ती येत राहीली. तीन महिन्यांनंतर योगायोगाने तिचं लग्न ठरलं.तुझ्या जोडीदाराबरोबर गप्पागोष्टी करताना तू जर अशी रडत बसलीस तर लग्न मोडण्याचा सुद्धा प्रसंग येऊ शकतो. या सावध सूचनेमुळे तिच्यातील बदलांना अधिक गती मिळाली.आजच्या संपूर्ण दिवसात भावनांवरील नियंत्रण जराही जाणार नाही यासाठी एक टार्गेट तिला दिलं गेलं. याप्रमाणे विचारांना वळण मिळून भावनेच्या आहारी जाऊन प्रतिसाद देण्याला लगाम लावता आला. तिच्यात हळूहळू चांगली सुधारणा होऊ लागली. तिच्या होणाऱ्या जोडीदाराचीही भेट झाली.त्यालाही काही गोष्टींची कल्पना दिल्याने त्याचीही यामध्ये मदत
झाली. चांगले विचार सकारात्मक भावना उत्पन्न करत असतात. जसे विचार असतील तशा भावना उत्पन्न होतात आणि त्याप्रमाणे कृती घडते. मनस्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. विचार बदलायचा म्हणजे काय तर आपण मनाशी सतत जे स्वगत बोलतो ते पडताळणे आणि आवश्यक असेल तर ते बदलवणे गरजेचं असतं.
स्वगतातील बदल कृतिशील करण्यास नक्की मदत करतात. आपले स्वगतातील विचार मात्र विवेक पूर्ण, वस्तुस्थितीवर आधारित असण्याबरोबरच, आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रेरित करणारे असणे आवश्यक आहे हे मात्र खरे!
अॅड सुमेधा देसाई