गदगमधील भीषण हत्याकांडाला वाचा
सावत्र भावाकडून 65 लाखांची सुपारी : स्थानिक तसेच मिरजेतील मारेकऱ्यांना अटक
गदग : गदग-बेटगेरी नगरपालिकेच्या उपाध्यक्षांच्या मुलासह चौघा जणांचा खून करण्यात आला होता. या भीषण खून प्रकरणाचे धागेदोरे मिरज, जि. सांगलीपर्यंत पोहोचले असून गदग पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून मिरज येथील पाच जणांचा समावेश आहे. शुक्रवारी पहाटे नगरपालिकेच्या उपाध्यक्षा सुनंदा बाकळे यांचा मुलगा कार्तिक (वय 27) व कोप्पळहून आलेले त्यांचे नातेवाईक परशुराम जगन्नाथसा हादिमनी (वय 55), त्यांची पत्नी लक्ष्मीबाई (वय 45), त्यांची मुलगी आकांक्षा (वय 17) यांचा भीषण खून करण्यात आला होता.
विशेष पथकांची कामगिरी
खुनाच्या या घटनेने केवळ गदगच नव्हे संपूर्ण राज्य हादरले होते. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश यांच्या मार्गदर्शनाखाली गदगचे जिल्हा पोलीसप्रमुख बी. एस. न्यामगौडा यांनी गदग, धारवाड, बागलकोट येथील अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुखांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकांची स्थापना केली होती. विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी गदग व मिरज येथील आठ जणांना अटक केली आहे. रियल इस्टेट व्यावसायिक प्रकाश रामचंद्रसा बाकळे यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा विनायक प्रकाश बाकळे याने आपले वडील प्रकाश, सावत्र आई सुनंदा व त्यांचा मुलगा कार्तिक यांच्या खुनासाठी 65 लाख रुपयांची सुपारी दिली होती. 2 लाख रुपये देऊन उर्वरित रक्कम खुनानंतर देण्याचे ठरविले होते. मिरजेतील पाच जणांनी गदगला येऊन चौघा जणांचा भीषण खून केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी विनायक बाकळे (वय 31) रा. गदग, फैरोज निसारअहमद खाजी रा. गदग, झिशान मेहबूबअली खाजी रा. गदग, साहिल अश्फाक खाजी (वय 19), सोहेल अश्फाक खाजी (वय 19) दोघेही रा. लक्ष्मी मार्केट मिरज, सुलतान जिलानी शेख (वय 23) रा. प्रताप कॉलनी मिरज, महेश जगन्नाथ साळुंखे (वय 21) रा. घिसाडी गल्ली, मिरज, वाहिद लियाकतअली बेपारी (वय 21) रा. मोमीन गल्ली, मिरज अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खुनासाठी वापरण्यात आलेली फैरोजची अल्टो कार पोलिसांनी जप्त केली आहे. खुनाच्या घटनेनंतर केवळ 72 तासात पोलिसांनी त्याचा छडा लावला आहे. राज्य पोलीस महासंचालक अलोक मोहन यांनी विशेष पोलीस पथकाला 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सुरुवातीला दरोड्यासाठी चौघा जणांचा खून झाल्याचा संशय होता. मात्र, त्यांच्या अंगावरील दागिने तेथेच होते. त्यामुळे तपासाची दिशा बदलली. आपले वडील, सावत्र आई व सावत्र भावाच्या खुनासाठी विनायक बाकळे या रियल इस्टेट व्यावसायिकाने सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे.