For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पुस्तके वाचा, पैसे मिळवा

06:25 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुस्तके वाचा  पैसे मिळवा
Advertisement

अलिकडच्या काळात पुस्तके आणि ग्रंथ वाचण्याची आवड बरीच कमी झाली आहे. लोकांना झटपट माहिती हवी असते. पुस्तके वाचणे, त्यांच्यातील आशयावर विचार करणे आणि आपले स्वत:चे मत बनविणे, ही बौद्धिक प्रक्रिया आता अनेकांना आवडेनाशी झाली आहे. तथापि, पुस्तके वाचण्यातून जी बौद्धिक आणि वैचारिक प्रगती होते, ती अन्य माध्यमांमधून होणे अशक्य असते, असे अनेक तज्ञांचे अभ्यासपूर्वक म्हणणे आहे. पुस्तके वाचण्याची आवड पुन्हा निर्माण व्हावी, यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत. असाच एक स्तुत्य उपक्रम पंजाब राज्यातील मोगा जिल्ह्यात असणाऱ्या रणसिंह कलान या गावात चालविण्यात येत आहे. या गावात एक ग्रंथालय असून त्यात 1 हजाराहून अधिक पुस्तके आणि ग्रंथ आहेत. सर्वसाधारणपणे आपण ग्रंथालयात शुल्क भरुन नाव नोंदवितो आणि पुस्तके किंवा मासिके घरी आणून वाचतो. या ग्रंथालयात मात्र पुस्तके वाचणाऱ्यांनाच मानधन दिले जाते. तसेच त्याने पुस्तक वाचनातून कोणते ज्ञान मिळविले, हे जाणून घेण्यासाठी गावाच्या वतीने परीक्षाही घेण्यात येत असते.

Advertisement

या गावात हा एकच उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे नाही. तर पर्यावरण संरक्षणासाठीही अभिनव मार्गांनी प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यावरणाला सर्वात जास्त धोका प्लॅस्टिक कचऱ्याचा आहे. तेव्हा गावात प्लॅस्टिक कचरा असू नये. म्हणून तो आणून देणाऱ्यास साखर दिली जाते. तसेच वृक्षारोपाणासाठी आणि वृक्ष संगोपनासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. विद्यार्थ्यांना शिक्षण केवळ शाळा किंवा महाविद्यालयांमध्येच मिळत नाही, तर ते निसर्गाच्या सान्निध्यात राहून किंवा  अभिनव उपक्रमांमध्ये सहभागी होऊनही मिळत असते, असा या गावाचा विश्वास आहे. या उपक्रमांना गावातील ज्येष्ठांपासून सानांपर्यंत सर्वांचे प्रोत्साहन मिळते. अशा उपक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बौद्धिक प्रगती अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळून आले आहे. विशेषत: पुस्तके वाचण्याच्या सवयीमुळे विविध विषयांमधील विद्यार्थ्यांचे स्वारस्य वाढताना दिसून येते. तसेच त्यांची दृष्टी अधिक व्यापक होऊन विचार प्रक्रियेतही सुधारणा दिसून आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.