कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गवाणकरांच्या वस्त्रहरण नाटकामुळे मालवणीला खरी ओळख मिळाली

12:04 PM Oct 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

साहित्यिक प्रवीण बांदेकर यांची प्रतिक्रिया

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी
वस्त्रहरण या मालवणी बोलीभाषेतील नाटकामुळे जगभरातल्या मराठी मुलखात नाव झालेल्या गंगाराम गवाणकर यांचं दुःखद निधन झालं. वस्त्रहरणच्या यशात मच्छिंद्र कांबळी यांचाही मोठा वाटा असला, तरी वस्त्रहरणची संहिताही तितकीच दमदार आणि लवचिक होती, हेही मान्य करायला हवे. मालवणी ही खरंतर सिंधुदुर्ग या एकाच जिल्ह्यात बोलली जाणारी मराठीची बोली. पण बोलीतील एका नाटकाचे इतके प्रयोग व्हावेत, हे अचंबित करणारे आहे. या नाटकाच्या निमित्ताने मालवणीची ओळख सर्वदूर होऊन मुख्य धारेतील अनेक कथा-कादंब-या, नाटके, मालिका, सिनेमा यांतून मालवणीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला अशी प्रतिक्रिया साहित्य अकादमी प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, मालवणी माणूस चारचौघात मोठमोठ्याने मालवणी गजाली मारायला सहसा संकोचत नाही. वस्त्रहरणच्या लोकप्रियतेनंतर (आणि त्यात पु.लं.च्या कौतुकाच्या शब्दांची भर!) तर अ-मालवणी लोकांनाही मालवणी बोलायला भाग पाडणारी परिस्थिती निर्माण झालेली दिसते. आमच्या ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकरांका ऐकलात ना? समोर पंतप्रधान येवं दे नाय तं राष्ट्रपती, दादा आपला मालवणी बोलूचा सोडनत नाय! झक मारीत मग समोरचा माणूस मालवणी हेल काढायला लागतो. मला या सगळ्याचं श्रेय गवाणकरांच्या वस्त्रहरणला द्यावंसं वाटतं. मालवणीसारख्या मराठीच्या बोली तर सोडूनच द्या, पण मुख्य प्रवाहातील मराठी भाषेचाही ज्या वेगाने संकोच होऊ लागलाय, ते पाहता गवाणकरांसारख्या लेखकांचं मोल लक्षात येऊ शकतं. मराठी मराठी करणारे शिक्षक -प्राध्यापक-पत्रकार-लेखक-राजकारणी आज जी मराठी भाषा सार्वजनिक ठिकाणी वापरतात, ती कुठची, कसली मराठी आहे? अभिजात भाषा म्हणून अभिमान बाळगावा, अशी भाषा यांच्या मुखातून येते आहे का? उर्वरित महाराष्ट्र जाऊ दे, मी माझ्या मालवणी मुलखापुरतं बोलतो. ज्या नाथ पै, दंडवतेंचं नाव आम्ही वारंवार घेतो, त्यांचा वारसा चालवणा -या माझ्या जिल्ह्यातील अपवाद म्हणूनही एकाही राजकारणा-याला मराठी नीट वापरता येत नाहीये. हिंदी, इंग्रजी दूरची गोष्ट. बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा सांगणारे पत्रकार असोत की केशवसुत-साने गुरुजी-आरती प्रभूंचा वारसा सांगणारे साहित्यिक, कुणाला भाषेचं सामर्थ्य कळलंय? कुणाला कशाचं काय पडलंय!गवाणकरांसारखे लेखक म्हणूनच मला थोर वाटतात. बोलीची सगळी क्षमता हेरून तिला अशी कलाकृतीसाठी वापरणं, सोपं नक्कीच नाही. गवाणकरांनंतर इतक्या वर्षांत त्याच ताकदीचा दुसरा मालवणी लेखक का झाला नसावा, याचं उत्तर यातूनच आपसूक मिळू शकतं. काळ सोकावला की सगळ्यात आधी सामान्य माणसं जी भाषा बोलतात ती भाषा मरते, असं न्गुगी वा थिवांग म्हणालेला. आमची भाषा मारायला नि काळाला सोकावू द्यायला, दुसरं कुणी नाही,आम्ही करंटेच कारणीभूत आहोत. आम्हालाच आत्महत्या करायची खाज असेल, तर गवाणकर असोत की आणखी कुणी, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे, हाच आमचा मराठी बाणा राहील, हे नक्की, असेही बांदेकर यांनी नमूद केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update# konkan update# gangaram gavhankar #pravin bandekar #
Next Article