वैभव नाईकांना जनतेने पराभवाची चपराक दिली
आचरा ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांची प्रतिक्रिया
मालवण | प्रतिनिधी
वैभव नाईक यांनी मागील 9 वर्षात काही न करता जनतेला भूलथापा, खोटी आश्वासनेच दिली. त्यामुळे जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव करून वैभव नाईक यांना चपराक दिली आहे. त्यामुळे वैभव नाईकांनी समजावे आचऱ्याच्या श्री देव रामेश्वर भूमीतून त्यांची पराभवाची जी सुरूवात झाली आहे ती आता 2024 ला निलेश राणे आमदार झाल्या शिवाय थांबणार नाही. अशी रोखठोक व ठाम विश्वासदर्शक भूमिका भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी आचरा ग्रामपंचायत भाजप युतीच्या विजयानंतर स्पष्टपणे मांडली आहे.
आचरा ग्रामपंचायत निवडणूकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भावी आमदार निलेश राणे या सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने तसेच तालुक्यातील तसेच आचरे गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून हा विजय आहे. आम्ही सोबत होतो मात्र, हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा व निलेश राणे यांच्या नेतृत्वाचा आहे.
उबाठा गटाचे आमदार, खासदार तसेच पदाधिकारी आचरा गावात ठाण मांडून होते. मात्र, आमचे विद्यमान सरपंच जेरॉन फर्नांडिस व सर्व सदस्य, उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घरोघरी प्रचार केला. केंद्र व राज्य शासन यांच्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वासामान्य जनतेसाठी राबवलेल्या योजना, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेसाठी करत असलेले विकासकाम सोबत निलेश राणे मतदारसंघात करत असलेले काम, निलेश राणे जास्तीत जास्त निधी कुडाळ ,मालवण तालुक्यात खेचून आणत आहेत. पालकमंत्री यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी मोठे सहकार्य मिळत आहे. हे सर्व जनतेपर्यत पोहचले. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वांना लाभला. म्हणूनच जेरॉन फर्नांडिस व सहकारी यांचा मोठा विजय झाला आहे. अशी प्रतिक्रिया दत्ता सामंत यांनी यावेळी दिली.