For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मायेच्या पुरातून पोहून पैलतीराला लागणे महाकर्मकठीण काम आहे

06:57 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
मायेच्या पुरातून पोहून पैलतीराला लागणे महाकर्मकठीण काम आहे
Advertisement

माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा । कासेस लागले माझ्या ते चि जाती तरूनिया  ।। 14 ।।

Advertisement

ह्या श्लोकाच्या विवरणात माउली मायचे वर्णन करताना नदीच्या आलेल्या महापुराच्या रूपकाची योजना करतात. ते म्हणतात, भगवंताच्या शरीरापासून जरी सर्व प्राणी तयार झालेले असले तरी ते मायेने त्यांच्यापासून विलग झालेले असल्याने त्यांना पाहू शकत नाहीत. आपण मायेने ग्रासलेलो आहोत हे ज्यांनी ओळखलेले असते ते त्यांना भेटण्यासाठी आसुसलेले असतात. मायानदीच्या अलीकडील काठावर भगवंतांना भेटण्याची उत्सुकता असलेले लोक उभे असतात तर भगवंत पलीकडील काठावर उभे असतात. मध्ये मायानदी दुथडी भरून वहात असते.

ज्यांना भगवंतांना भेटायचे असते त्यांना प्रचंड वेगाने वहात असलेली मायानदी पार करून त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. मायानदीबद्दल सविस्तर सांगताना माऊली पुढे म्हणतात, ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून ती उगम पावते. सृष्टीचा विस्तार जसजसा वाढत जातो तसतसा मायानदीचा विस्तारही वाढतो आणि वेगही वाढतो. तिच्या दोन्ही बाजूला प्रवृत्ती आणि निवृत्ती असे दोन काठ असतात. तिच्या पात्राला मत्सराची आणि प्रपंचाची वळणे पडलेली असतात. तिच्या पाण्यात तरुण स्त्रियारुपी मोठे मासे चमकत असतात. तीला कर्माकर्मरूपी पूर येत असतो आणि त्यावर सुखदु:खरूपी शेवाळ तरंगत असते. तिच्या पात्रात रतीची बेटे असून त्या बेटावर कामरूपी लाटा आदळतात आणि त्या लाटावर जीवरूपी प्राणीमात्रांचा समुदाय पाण्याच्या फेसासारखा हिंदकळत असतो.

Advertisement

मायानदीमध्ये अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत, त्यावर विद्या, धन व कुल ह्या तीन मदांच्या उकळ्या येत असतात आणि विषयरूपी लाटा उसळत असतात. ह्या नदीमध्ये उदयास्तांचे लोंढे, जन्ममृत्युरूप खळगे पडतात व तेथे पंचमहाभूतांपासून झालेले शरीररूपी बुडबुडे तयार होतात व फुटतात. नदीतील अविवेक व गोंधळ नावाचे मासे सात्विक धैर्याला गिळून टाकतात. येथे अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरत असतात. पात्रात गैरसमजांचा चिखल भरपूर असतो. चिखलामुळे पाणी गढूळ झाल्याने लोकांना तळाशी बसलेल्या आशारूपी गाळाचा अंदाज येत नसल्याने त्यात ते अलगद फसतात. मायानदीतील पाणी रजोगुणामुळे जोरजोरात खळबळू लागते तसेच त्या पाण्याला तमोगुणाची मोठी धार असते. अशी ही मायानदी तरून जाण्यास फार कठिण आहे. हिच्यात उठणाऱ्या पुनर्जन्मरूपी लाटांच्या उसळ्या सत्यलोकाच्या बुरुजांवर जाऊन आदळतात. त्यांच्या जोरदार आघातामुळे ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात. त्या पाण्याच्या वेगाने सतत वाहात असलेला महापूर थांबत नाही. अशा ह्या मायेच्या पुरातून पोहून पैलतीराला लागणे महाकर्मकठीण काम आहे. या मायानदीसंबंधाने एक आश्चर्य म्हणजे हिच्यातून तरून जाण्याला जो जो म्हणून उपाय करावा, तो तो अंगलटच येतो. कसा ते ऐक. बुद्धीच्या जोरावर ही नदी आपण तरून जाऊ असा विचार करून ज्यांनी ह्या नदीत ऊड्या मारल्या ते नंतर कोठे गेले ह्याचा पत्ताच लागत नाही. कित्येक ज्ञानी मंडळीना अभिमानाच्या डोहाने गिळून टाकले.

क्रमश:

Advertisement
Tags :

.