डबल सरप्राइजसह परतणार रीचर
ओटीटीच्या जगतात सर्वात चर्चित सीरिजमध्ये हॉलिवूड स्टार एलन रिचसन याच्या ‘रीचर’चा समावेश आहे. आतपर्यंत रीचरचे तीन सीझन आले असून तिन्ही यशस्वी ठरले आहेत. आता निर्मात्यांकडून याच्या चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. याचबरोबर रीचरमधील लोकप्रिय व्यक्तिरेखा अन् स्पाय एजंट ‘नीली’वरून मोठे सरप्राइज देण्यात आले आहे. तिसऱ्या सीझनची कहाणी अत्यंत उत्कंठा वाढविणारी ठरली होती. आता रीचरचा नायक एलन रिचसनने चौथ्या सीझनची घोषणा केल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. एलनने रीचरचे फर्स्ट लुक पोस्टर शेअर करत 12 ऑगस्ट रोजी चौथ सीझन ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर प्रेक्षकांना यावेळी सीरिजमधील मुख्य व्यक्तिरेखा नीलीचा स्पिन ऑफही पाहता येणार आहे. रीचर वेबसीरिजमध्ये नीलीची भूमिका प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मारिया स्टेनने साकारली आहे. अशाप्रकारे रीचरच्या निर्मात्यांनी चाहत्यांना डबल सरप्राइज दिले आहे. रीचर ही सीरिज भारतीय प्रेक्षकांची पसंतीची ठरली आहे. एक स्पाय थ्रिलर म्हणून रीचरने स्वत:च्या सर्व सीझनच्या बळावर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.