For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पश्चिम बंगालमध्ये आज पुनर्मतदान

06:38 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
पश्चिम बंगालमध्ये आज पुनर्मतदान
Advertisement

पंधरा मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाचा आदेश

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या द्वितीय टप्प्यात झालेल्या मतदानात काही मतदान केंद्रांमध्ये अवैध कृत्ये घडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा 15 मतदान केंद्रांमध्ये आज, 2 मे या दिवशी पुन्हा मतदान घेण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. काही मतदान केंद्रांमध्ये मतदान यंत्रांवरील ‘कमळ’ या चिन्हावर टेप चिकटवून ते मतदारांना दिसू नये, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याच्या तक्रारी आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने या सर्व तक्रारींची माहिती घेऊन हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

मग्राहाट पश्चिम आणि डायमंड हार्बर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये ही 15 मतदानकेंद्रे आहेत. या मतदानकेंद्रांवर आज शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे पुनर्मतदान घेण्यात येईल. ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात ही मतदानकेंद्रे आहेत. या केंद्रांवर मतदारांना धमकाविण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच ‘कमळ’ या चिन्हावर टेप चिकटविल्याचेही दिसून आल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. काही मतदारांनीच या तक्रारी केल्या होत्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांची त्वरित नोंद घेऊन सविस्तर अहवाल मागविला होता. तसेच स्वत: लक्ष घालून तपासणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी हा निर्णय घोषित करण्यात आला.

तीन जिल्ह्यांमध्ये मतदानोत्तर हिंसाचार

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद, मालदा आणि उत्तर 24 परगाणा या जिल्ह्यांमध्ये मतदानोत्तर हिंसाचार झाल्याची वृत्ते येत आहेत. मुर्शिदाबाद जिल्ह्यात एका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मतदानकेंद्र प्रतिनिधीवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तक्रार सादर झाली असून पोलीस चौकशी करत आहेत. राहुल अमीन असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. तो एका चहा स्टॉलवर चहा पीत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

कोलकाता येथे प्रतिबंधात्मक आदेश

कोलकाता पोलिसांनी शुक्रवार संध्याकाळपासून मतगणनेपर्यंत सर्व मतगणना केंद्रांपासून 200 मीटर अंतराच्या आत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. त्यामुळे दोन पेक्षा अधिक लोकांना जमाव करून या अंतरात येता येणार नाही. हा आदेश कोलकाता पोलीस विभागाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व मतगणना केंद्रांवर लागू राहणार आहे. गुरुवारी मतदानयंत्रे असलेल्या स्ट्राँगरुमबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून धरणे धरले होते. तसा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement
Tags :

.