कॅन्टोन्मेंट भरती गैरव्यवहार प्रकरणाची पुन्हा चौकशी
बेंगळूर येथील सीबीआय पथक बेळगावमध्ये दाखल
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. बेंगळूर येथील सीबीआयचे पथक मागील दोन दिवसांपासून बेळगावमध्ये ठाण मांडून आहे. त्यामुळे या प्रकरणात गुंतलेले कॅन्टोन्मेंटचे कर्मचारी व अधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. सीबीआय पथक दाखल झाल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये एकूण 29 कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्यात आली. या भरतीवेळी लाखो रुपयांचा गैरव्यवहार करून कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. तक्रारदारांनी सीबीआय यंत्रणांकडे तक्रार करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 2023 पासून बेंगळूर येथील सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. मध्यंतरी काही कर्मचाऱ्यांना बेंगळूर येथे बोलावून चौकशी करण्यात आली होती. 11 मार्चपासून आठवडाभर चौकशी सुरू होती. मागील दीड महिन्यापासून चौकशी थांबली होती. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा बेंगळूर येथील सीबीआयचे पथक बेळगावमध्ये दाखल झाले आहे. कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली जात आहे. कोणत्या कर्मचाऱ्याकडून पदभरतीसाठी किती पैसे घेतले, याची माहिती घेतली जात आहे. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दोन वर्षांपासून सीबीआयकडून चौकशी...
मागील दोन वर्षांपासून सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सुरुवातीला बेळगावमध्ये चौकशी झाल्यानंतर बेंगळूर येथे गुन्हे दाखल करण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी काही कर्मचाऱ्यांना बेंगळूरला बोलावून तेथे चौकशी करण्यात आली होती. मार्च महिन्यात बेळगावमध्ये चौकशी केली होती. आता पुन्हा चौकशी करण्यात येत असल्याने कर्मचारी घाबरले आहेत.