For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सागरी मार्गाची पुन्हा चाचपणी !

06:37 AM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
सागरी मार्गाची पुन्हा चाचपणी
Advertisement

भारताला नामोहरम करण्यासाठी चीन पाकिस्तानला पुढे करीत अनेक कट कारस्थाने आखत आहे. मात्र भारताची रणनीती आणि तपास यंत्रणा सतर्क असल्याने चीनचे मनसुबे यशस्वी होत नाहीत. तर चीनच्या मदतीने मुंबईवर पुन्हा एकदा  हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी संघटना सागरी मार्गाची येनकेन प्रकारेन चाचपणी घेत आहेत. 

Advertisement

देशांत सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहण्यास सुरूवात झाली आहे. नेमका या परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी अनेक दहशतवादी संघटना सज्ज झाल्यात. तर दुसरीकडे सातत्याने भारताला युनोच्या संरक्षण समितीत स्थान मिळू नये यासाठी विरोध करणाऱ्या चीननेदेखील या दहशतवाद्यांना छुपा पाठिंबा देण्यास सुरूवात केली. पाकिस्तानला लागणारी शस्त्रास्त्रs, त्यांच्या आण्विक कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य यांचा पुरवठा चीनने करण्यास सुरूवात केली. तसेच या शस्त्रांचा वापर भारत विरोधी करायचा झाल्यास तो सागरी मार्गाने पुन्हा करता येईल का? याची चाचपणी चीनने सातत्याने केली आहे. मात्र हा प्रयत्न भारतीय कस्टम विभागाने हाणून पाडला. जानेवारी महिन्यात देखील चीनने पाकिस्तानच्या मदतीने काही आण्विक शस्त्रs बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासाठी लागणारी उपकरणे हे कराचीला पाठविण्यासाठी भारतीय सागरी सीमा किती सुरक्षित आहेत, याची चाचपणी केल्याचे समोर आले.

कारण जर यामध्ये कुचराईपणा अथवा बेजबाबदारपणा झाला असता तर पुन्हा एकदा सागरी मार्गाने हल्ला करण्याचे मनसुबे दहशतवाद्यांनी तडीस नेले असते. कारण यापूर्वी सागरी मार्गानेच दहशतवादी हल्ले घडवुन आणल्याचा इतिहास आहे. यामुळे सागरी सुरक्षेबाबत सर्व यंत्रणा सज्ज आहेत. न्हावा शेवा बंदरात भारतीय सुरक्षा यंत्रणांनी 23 जानेवारीला चीनमधून पाकिस्तानात जाणारे जहाज अडवले. कराचीकडे जाणाऱ्या या जहाजाला संशयाच्या आधारे थांबवण्यात आले होते. या जहाजात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या होत्या. ज्याचा वापर पाकिस्तानच्या आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी केला जाऊ शकतो. पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित हे संशयास्पद जहाज भारतीय बंदरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे कस्टम अधिकाऱ्यांनी संगणक संख्यात्मक नियंत्रण मशीनसह मालाची तपासणी केली. त्यात डीआरडीओचे अधिकारीही सहभागी झाले होते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पथकाने पाकिस्तानला जाणाऱ्या या जहाजाच्या मालाची तपासणी केली आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान या मालाचा वापर अणुकार्यक्रमासाठी करू शकतो. मुंबई बंदरात थांबलेल्या जहाजात एक माल असल्याचा संशय आहे, ज्याचा वापर पाकिस्तान त्याच्या आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाकरीता करू शकतो. त्यात इटालियन कंपनीने बनवलेले

Advertisement

कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल (सीएनसी) मशीन सापडले आहे. ज्याचा डीआरडीओच्या पथकाने तपास केला. जहाजात सापडलेली सीएनसी मशीन संगणक नियंत्रित आहेत. 22 हजार 180 किलो वजनाचे हे साहित्य तैयुआन मायनिंग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंपनी लिमिटेडने पाठवले होते. हे पाकिस्तानमधील कॉसमॉस इंजिनिअरिंगसाठी होते. डीआरडीओने पुष्टी केली आहे की या मालामध्ये आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांशी संबंधित आवश्यक साहित्य सापडले आहे. युरोप आणि अमेरिकेतून प्रतिबंधित वस्तू घेण्यासाठी पाकिस्तान आता चीनचा वापर करत असल्याचा हा एक पुरावाच आहे. या प्रकरणात देखील, माल पाठवणाऱ्याची नोंदणी ‘शांघाय जेएक्सई ग्लोबल लॉजिस्टिक कं. लिमिटेड’ म्हणून करण्यात आली. हे काही पहिल्यांदाच झाले नाही. यापूर्वीही चीनकडून पाकिस्तानला लष्करी दर्जाच्या वस्तू पाठवण्यात आल्या होत्या. चीनमधून पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या ‘दुहेरी वापर’ लष्करी दर्जाच्या वस्तू भारतीय बंदरांवर अधिकाऱ्यांनी यापूर्वी देखील जप्त केल्या आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये, चीन ‘इंडस्ट्रियल ड्रायर्स’च्या नावाखाली चीन पाकिस्तानला ऑटोक्लेव्हचा पुरवठा करत असल्याचे आढळून आले. पाकिस्तानी संरक्षण पुरवठादार, कॉसमॉस अभियांत्रिकी, 12 मार्च 2022 पासून तपासाधीन आहे, जेव्हा भारतीय अधिकाऱ्यांनी न्हावा शेवा बंदरावर इटालियन-निर्मित थर्मोइलेक्ट्रिक उपकरणांनी भरलेले जहाज रोखले. जून 2023 मध्ये, यूएस ब्युरो ऑफ इंडस्ट्री अँड सिक्युरिटीने पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित वस्तूंच्या पुरवठ्यात गुंतलेल्या तीन कंपन्यांवर निर्बंध लादले होते. हे सर्व पाहता चीनदेखील पाकिस्तानला आणि त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांना कशाप्रकारे मदत करत आहे हे आढळून आले आहे.

देशाची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बिघडवत देशात हाहाकार माजविण्याची पाकिस्तान आणि चीन रणनिती आखत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी देखील पाकिस्तानने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहीमला बरोबर घेऊन 1993 साली मुंबई शहरात

बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यादरम्यान देखील रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आरडेक्स ही स्फोटके उतरविली होती. त्यानंतर ही स्फोटके माहीम येथील टायगर मेमन याच्या

गॅरेजमध्ये उतरवून 12 मार्च 1993 साली साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2008 साली लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने दहा दहशतवाद्यांना सागरी मार्गाने मुंबईत घुसविले. या दहशतवाद्यांनी तब्बल 56 तास मुंबई आणि मुंबईकरांना वेठीस धरले होते. आत्तापर्यंत मुंबईवर जे काही हल्ले झाले आहेत ते सर्व सागरी मार्गाने झाले आहेत. यामुळे तपास यंत्रणांनी सागरी मार्गाची सुरक्षा तर वाढविली आहेच मात्र मुंबई पोलिसांचीदेखील समुद्रात नियमीत गस्त सुरू असते. अशावेळी तपास यंत्रणा किती सतर्क आहेत, याची चाचपणी करून हल्ल्यांचा कट आखण्याचा देखील मनसुबा चीन तसेच पाकिस्तानचा असू शकतो.

मात्र सागरी सुरक्षेबाबत मुंबई पोलीस पूर्ण सतर्क आहेत. वेळोवेळी येणारे धमकीचे फोन अथवा संशयास्पद व्यक्तीवर पोलिसांची बारीक नजर आहे. यामुळे चीन किंवा पाकिस्तानने कितीही सागरी मार्गाची चाचपणी केली तरी तपास यंत्रणा या सतर्क असणार यामध्ये तिळमात्र शंका नाही.

- अमोल राऊत

Advertisement
Tags :

.