बीएसएफमधील उमेदवारांना पुन्हा सेवेत घ्या
डॉ. गिरिराज यांची पत्रकार परिषदेत मागणी
बेळगाव : बीएसएफमध्ये 2023 साली भरती झालेल्या उमेदवारांना स्कील डेव्हलपमेंट सर्टिफिकेट (एनएसओएफ) नकली असल्याचे कारण देत नोकरीतून कमी करण्यात आले. देशभरातील अशा एकूण आठशे ते नऊशे उमेदवारांवर अन्याय झाला आहे. बीएसएफमध्ये सेवा केलेली दोन वर्षे हीच अॅप्रेन्टिसशीप समजून उमेदवारांना पुन्हा सेवेत कायम करावे, अशी मागणी नॅशनल स्कील डेव्हलपमेंट पार्टनरचे उपाध्यक्ष डॉ. गिरिराज यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
दोन वर्षे केलेल्या उमेदवारांना अचानक सेवेतून कमी केले. त्यामुळे उमेदवारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कुटुंबाला काय उत्तर द्यावे? या विवंचनेत उमेदवार आहेत. रितसर भरती प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांना सेवेतून कमी करणे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून उमेदवारांना सेवेत कायम करण्याची मागणी करण्यात आली.
उमेदवार मानसिक तणावाखाली आहेत. दोन वर्षे बीएसएफमध्ये सेवा मिळाल्याने अनेकांनी कर्ज घेतली आहेत. तर काहींनी लग्न केले आहे. परंतु, अचानक केवळ स्कील सर्टिफिकेट नकली असल्याचे कारण देत सेवेतून कमी करण्यात आले आहे. सरकारला ही विनंती आहे की, त्यांनी या सर्व उमेदवारांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, असे डॉ. गिरिराज यांनी सांगितले. यावेळी बीएसएफमधील उमेदवार उपस्थित होते.