कलंबिस्त सावंत माऊली मंदिराचा पुन: प्राणप्रतिष्ठापना सोहळा ६ रोजी
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील श्रीदेवी सावंत माऊली मंदिर पुन: प्राणप्रतिष्ठापना विधी कार्यक्रम मंगळवार दिनांक 6 मे ते गुरुवार 8 मे अशा तीन दिवशी आयोजित करण्यात आला आहे. कलंबिस्त येथील सावंत समाजाच्या वतीने हे मंदिर उभारण्यात आले आहे. कलंबिस्त गावचे ग्रामदैवत श्री लिंगेश्वर देवस्थान मंदिराच्या समोरच हे छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे. पूर्वी या ठिकाणी श्रीदेवी सावंत माऊलीची मूर्ती होती. आता या मूर्तीचे मंदिरामध्ये पुन:प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 6 मे रोजी सकाळी मंदिरात देवतांचे आगमन , गणेशवंदन ,देवाला नारळ ठेवणे , प्रायश्चित घेणे ,पुण्याहवाचन ,आचार्य पूजा, प्राकार शुद्धी, लिंगेश्वर मंदिरात जनकल्याण लघुरुद्र, अनुष्ठान देवी माऊली तत्व होम, दुपारी १ वाजता महाआरती आणि महाप्रसाद बुधवार ७ मे रोजी यजमान गणेश पूजा, पुण्याहवाचन ,मूर्ती जलाधीवास दुपारी १ वाजता महाआरती आणि महाप्रसाद , गुरुवारी ८ मे रोजी प्रमुख विधी सोहळा ,पुण्याहवाचन, प्रकारशुद्धी , ग्रहदेवता स्थापन, ग्रहयज्ञ. वास्तुस्थापना, मूर्ती स्थापना ,अभिषेक. दुपारी १ वाजता महाआरती आणि महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता स्थानिक ग्रामस्थांचे भजन. रात्री ९ वाजता श्री यक्षणी दशावतार नाट्य मंडळ माणगाव यांचा मित्रप्रेम दूर्वा सभोजन हे दशावतार नाटक होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कलंबिस्त सावंत समाज ग्रामस्थ व आप्तेष्ट यांनी केले आहे.
.